नवी दिल्ली : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून नामांकन दाखल करणारे बीएसएफचे बरखास्त  झालेले जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याविरोधात तेजबहादूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्यासोबत प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी बीएसएफ अधिकारी तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला. त्यानंतर शालिनी यादव या समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात मोदी यांना टक्कर देणार आहेत. 



तेजबहादूर यांना बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आल्याबद्दल दोन उमेदवारी अर्जात वेगवेगळी माहिती देण्यात आली होती. यादव यांनी 'भारत सरकार किंवा राज्य सरकार अधीन पद धारण करण्यादरम्यान भ्रष्टाचार किंवा अभक्तीच्या कारणामुळे पदच्युत करण्यात आले का?' या प्रश्नाच्या उत्तरात यादव यांनी 'होय' असे पहिल्या उमेदवारी अर्जात म्हटले होते. नंतर दुसऱ्या नामांकनपत्रात चुकीने या प्रश्नाला 'होय' असे उत्तर लिहिल्याचे म्हटले होते. आपल्याला भ्रष्टाचार किंवा अभक्तीसाठी बडतर्फ करण्यात आले नाही, असे नंतर नमुद केले. यावर तेजबहादूर यादव यांना २४ तासांत बीएसएफकडून नाहरकत प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.


निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी बुधवारी दुपारी ११ वाजता तेजबहादूर यादव आपल्या वकिलांसोबत आरओंना भेटण्यासाठी दाखल झाले होते. या भेटीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी यादव यांचा अर्ज रद्दबादल ठरवला. यावेळी, तेज बहादूर समर्थक आणि पोलिसांदरम्यान बाचाबाची झाली होती.