मुंबई : दीपावलीच्या मंगलपर्वाच्या निमित्ताने सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. मंत्रीमहोदयांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकानेच आपल्या परीने शुभेच्छा दिल्याचं पाहाला मिळत आहे. त्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या बऱ्याच काळापासून दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या पर्रिकर यांनी एका ध्वनिफितीच्या म्हणजेच ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून सर्वांनाच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


एफ.एम. रेडिओच्या माध्यमातूनही त्यांच्या या शुभेच्छा सर्व गोव्याच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या. 


'नमस्कार. मी गोव्याच्या सर्व जनतेला दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. येणारं वर्ष हे तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारं आणि जीवनात आनंदारी बरसात करणारं ठरो. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा..', असं ते या ध्वनीफितीमध्ये म्हणाले. 
गोव्यातील प्रसिद्धी आणि माहिती खात्यातर्फे पर्रिकरांच्या शुभेच्छा जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या. 


यापूर्वी त्यांनी १३ मे रोजी जनतेशी थेट संवाद साधला होता. ज्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांनी जनतेशी संवाद साधल्याचं पाहायला मिळालं.  


पर्रिकर यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्स रुग्मालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर गेल्या महिन्यातच ते दिल्लीहून गोव्यात परतले. सध्यच्या घडीला आजारपणामुळे ते कामापासून दूर असले तरीही जनतेशी असलेलं नातं त्यांनी या सणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जपल्याचं पाहायला मिळत आहे हे खरं.