Diwali 2019 : तेजपर्वाची उत्साहात सुरुवात
या सणाचे काही रंजक संदर्भ ठाऊक आहेत?
मुंबई : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि तेजाचा सण. अंधकाराकडून तेजाकडे केलेली यशस्वी वाटचाल म्हणजे दिवाळी. अशा या सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. साऱ्या देशात विविध राज्यांमध्ये विविध पद्धतींनी दिपोत्सव साजरा केला जात आहे. शेतात उगवलेल्या पिकांच्या कापणीचा काळही दिवाळीच्या दिवसांदरम्यानच असतो. यंदा मात्र महाराष्ट्रात पावसाच्या धारा सध्याच्या घडीलाही बरसत असल्यामुळे बळीराजा काहीसा चिंतातूर झाला आहे. पण, या प्रकाशमान पर्वाच्या निमित्ताने हे संकटही दूर होईल अशी आशा मात्र बळीराजाने सोडलेली नाही.
दिवाळी, दीपावली किंवा दीपोत्सवाचं या सणाचं महत्त्वं हे प्रत्येकाच्या लेखी वेगवेगळं आहे. अशा या सणाच्या दिवसाचा उल्लेख काही पौराणिक कथांमध्येही आढळतो. सातव्या शतकातील संस्कृत नाट्य 'नागनंदा'मध्ये या सणाचा उल्लेख 'दीपप्रतिपदुत्सवा' या नावाने आढळतो. ज्यामध्ये नवविवाहित दाम्पत्य एकमेकांना विष्णू आणि लक्ष्मीच्या लग्नाचं प्रतिक म्हणून दिवे भेट देतात.
दिवाळीच्या दिवसाचं आणखी एक महत्त्वं हे थेट रामायण आणि महाभारताशीही जोडलं गेलं आहे. चौदा वर्षांच्या वनवासानंतर राम आणि सीता जेव्हा स्वगृही परतले तेव्हा सारा आसमंत हा दिव्यांनी उजळून गेला होता. महाभारताच्या दृष्टीने पाहायचं झाल्य़ास तब्बल १२ वर्षांच्या वनवास आणि अज्ञातवासानंतर पांडव परतले तेव्हाही हे पर्व साजरा केलं गेलं होतं असं म्हटलं जातं.
प्रख्यात संस्कृत कवी, राजशेखर यांच्या काव्यमिमांसा या साहित्यातही दिवाळीचा उल्लेख आढळतो तो 'दीपमालिका' या शब्दाने. ज्यानुसार घराची स्वच्छता करुन ते अनेक दिव्यांनी प्रकाशमान केलं जातं. इथूनच दिवाळीच्या सणाची चाहूल लागताच साफसफाई, घर स्वच्छ करण्याची सुरुवात झाली असंही म्हटलं जातं.