BhauBeej Gifts Diwali 2023 : भावाबहिणीच्या नात्यातील आपुलकी साजरी करण्याचा हा दिवस. भाऊबिजेच्या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैभवासाठी प्रार्थना करते. आर्थिक नियोजन करताना कुटुंब आणि नात्यांचे महत्त्व हा सण अधोरेखित करतो. कुटुंबात परस्पर सहकार्याचा आणि आर्थिक ज्ञान एकमेकांशी वाटून घेण्याचा संदेश भाऊबिजेच्या निमित्ताने आपल्याला मिळतो. तुम्हीही तुमच्या बहिणीवर प्रेम करत असाल तर तुम्ही तिच्या भविष्याचा विचार करून आर्थिक मदत करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाऊबीज निमित्ताने पुढे दिलेल्या गोष्टींचा प्रत्यक्षात अवलंब केल्यास भवितव्य समृद्ध होऊ शकेल -


१. अर्थशिक्षण : आर्थिक विषयांवरील चांगले लेख, मासिके, ब्लॉग नियमितपणे वाचून स्वतःच्या आर्थिक ज्ञानात भर घालत राहणे ही काळाची गरज आहे.


२. इमर्जन्सी फंड : भविष्यकाळात येऊ घातलेल्या अनपेक्षित संकटांच्या वेळी उपयुक्त ठरेल असा इमर्जन्सी फंड उभारा.


३. विमा : तुमच्या गरजेला अनुसरून टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि गंभीर स्वरूपाच्या आजारासाठीचा विमा उतरवा. संकटाच्या काळात विमा हा तुमचा सर्वांत मोठा आधार ठरतो.


४. गुंतवणूक करा : आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे, योग्य पर्याय निवडून गुंतवणूक करा. गुंतवणूक करताना तुमच्या अॅसेट डायव्हर्सिफाय करा.


५. बजेट व्यवस्थापन : खर्च आटोक्यात ठेवून नियमितपणे बचत करत राहिल्यास तुमचा आर्थिक पाया भक्कम होईल.


या सणाच्या निमित्ताने काय शिकावे ? 


बहिणीला आर्थिक आधार द्या : कुटुंबातील सदस्यांशी आर्थिक व्यवहार करणे आणि त्यातून संकटाच्या वेळी एकत्रितपणे आर्थिक अडचणींचा सामना करणे आवश्यक आहे.


भावी पिढीसाठी आर्थिक नियोजन : आपण कमावलेल्या संपत्तीचे पुढील पिढीकडे सुलभ हस्तांतर करण्यासाठी नियोजन करा.


भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण हे परंपरा जोपासतातच, पण प्रत्येकाच्या वैयक्तिक आर्थिक नियोजनात उपयुक्त ठरेल, अशी बहुमोल शिकवणही देतात. धनत्रयोदशीचा सण गुंतवणूक विकेंद्रित करण्याचा आणि कालांतराने किंमत वाढत जाणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा धडा देतो. नरक चतुर्दशीचा सण आर्थिक साक्षरता आणि जोखीम व्यवस्थापन यांचे महत्त्व अधोरेखित करतो.


तर लक्ष्मीपूजनाचा दिवस संपत्तीचे व्यवस्थापन आणि नियमित बचत करण्याचा संदेश देतो. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आपल्या आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन करण्याची आणि नवी उद्दिष्टे निश्चित करण्याची संधी असते, तर भाऊबिजेचा दिवस हा कुटुंबातील परस्पर आर्थिक सहकार्य आणि पुढच्या पिढीकडे संपत्तीचे हस्तांतर करण्याची योजना आखण्याची शिकवण देतो.


आपल्या परंपरेत पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेले हे सामूहिक ज्ञान आणि आर्थिक नियोजनाची आधुनिक तत्वे यांचा एकत्रितपणे विचार करून आर्थिक नियोजन केल्यास गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढत आर्थिक सुबत्तेच्या दिशेने वाटचाल करणे सोपे होऊ शकेल. या सणांच्या निमित्ताने मिळणारा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवल्यास प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे आर्थिक भवितव्य उज्ज्वल करणे शक्य होईल.


दरम्यान, सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, प्राचीन ज्ञानाने ओतप्रोत भरलेले हे सण आपल्या समृद्धीच्या वाटेवरचा दीपस्तंभ ठरतील. आपला आशावाद आणि त्यानुसार ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करताना हे सण आणि त्यांच्या निमित्ताने मिळणारे संदेश आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील, यात शंका नाही.


(Disclaimer - : गुंतवणुकीचा कोणताही पर्याय निवडताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या, त्यानंतरच योग्य पर्याय निवडा)