Gold Rates Latest Update : दसरा, दिवाळी, अक्षय्य तृतीया हे असे काही दिवस असतात ज्यावेळी अनेकजण शक्य असेल तितकं का असेना पण, सोनं खरेदी करतात. यामागे असंख्य धारणा आहेत. यंदाच्या वर्षीसुद्धा दिवाळी, धनत्रयोदशी (धनतेरस) आणि लक्ष्मीपूजन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असतानाच अनेकांची सोनं खरेदीसाठी लगबग सुरु आहे. काही मंडळी मुहूर्तावरच सोनं खरेदी करणार आहेत तर, काहीजण ऐन दिवाळीत सोनं महागेल म्हणत आताच वळं, सोन्याचं बिस्कीट, एखादा दागिना खरेदी करताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील आठवड्याभरामध्ये सोन्याच्या दरांमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. तुटपूंजी घट वगळता दरांणध्ये समाधानकारक घट पाहायला मिळाली नसल्यामुळं अनेकांचाच हिरमोड झाला आहे. त्यातच आरबीआयची धोरणं, एकंदर राजकीय, आर्थिक अस्थिरता या साऱ्याचे थेट परिणाम सोन्याच्या दरांवर दिसून येत आहेत. ज्यामुळं सोन्याचे दर 61 ते 63 हजार रुपयांच्या पातळीत असल्याचं आढळून येत आहे. किंबहुना येत्या काळातही हे दर असेच राहतील असं तज्ज्ञांचं मत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालातून यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


हेसुद्धा वाचा : हा तर लॉकडाऊन! मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; सणासुदीच्या दिवसांत दारं- खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना 


मध्यवर्ती बँकांच्या धोरणांचे परिणाम सोन्याच्या दरांवर 


फक्त आरबीआय (RBI) नव्हे, तर इतरही मध्यवर्ती बँकांमधील धोरणांमध्ये होणारे बदल सोन्याच्या दरांवर कमीजास्त प्रमाणात सातत्यानं परिणाम करताना दिसत आहेत. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात मागील वर्षभरात 5.25 टक्के इतकी वाढ केली आहे. फक्त फेडरल नव्हे, तर इतरही मध्यवर्ती बँकाची हीच भूमिका. सध्या या बँकांकडून इंधन दर, महागाई आणि वार्षिक उत्पन्न अशा गोष्टींवरही लक्ष केंद्रीत केलं जात असल्यामुळं त्या दृष्टीनं आखल्या जाणाऱ्या धोरणांचे परिणाम सोन्याच्या दरवाढीला चालना देणारे ठरत असल्याचा मुद्दा अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. 


अहवालातील आकडेवारी नेमकं काय सांगते ? 


अहवालातून समोर आलेल्या वृत्तानुसार गेल्या काही वर्षांमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा वाढला असून, सध्याही याच गुंतवणुकीला अनेकजण प्राधान्य देताना दिसत आहेत. परिणामी जिथं सणावाराच्याच दिवसांमध्ये सोन्याची मागणी वाढते तिथं आता मात्र सोन्यातून मिळणारा परतावा पाहता वर्षभर कमीजास्त प्रमाणात त्याला प्राधान्य मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, ज्यांनी 2019 मध्ये सोन्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली होती त्या मंडळींना आता जवळपास 60 टक्क्यांचा परतावा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची स्थिती पाहायची झाल्यास ती प्रति औंस 2 हजार डॉलर इतकी आहे. परिणामी येते काही दिवस सोन्याच्या दरांचा आलेख उंचावतानाच दिसेल हे खरं.