Deepavali Village : दिवाळीचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला असून, देशविदेशात हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. काही ठिकाणी दिवाळीची तयारी अद्यापही सुरुच आहे. असं असतानाच चर्चा एका अशा गावाची होतेय ज्याच्या नावातच दीपावली आहे. आश्चर्य वाटतंय ना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात एक असं खेडेगाव आहे, ज्या गावाचं नावच आहे, दीपावली. गारा मंडल इथं हे गाव स्थित असून, इथं पाच दिवस दिवाळीचा सण साजरा केला जातो. खेडेगावातील पूर्वजांच्या मते इथं दिवाळीचा जण पूर्वजांच्या पुजेनंतर साजरा केला जातो. या परंपरेमागंही एक खास कारण आहे. 


हे कारण आणि त्याची कहाणी तुम्हाला गतकाळात घेऊन जाते. प्राचीन काळात श्रीकाकुलम प्रांताचा एक राजा होता, जो आपल्या वाटेत याच गावाजवळून पुढं जात असे. एके दिवशी राजा कुरमनाथ मंदिराहून परतताना अचानक बेशुद्ध झाला आणि त्यावेळी गावकरी त्याच्यापाशी आले. त्यांनी तिथं येऊन त्याच्याजवळ एक दिवा लावला आणि त्या राजाची सेवा केली. राजा जेव्हा शुद्धित आला, त्यावेळी त्यानं या गावाचं नाव विचारलं त्यावेळी या गावाला काहीच नाव नाहीय असं गावकऱ्यांनी राजाला सांगितलं. 


गावाला कोणतंच नाव नाही, असं म्हणताच राजा म्हणाला, 'तुम्ही दिव्यांच्या प्रकाशात माझी सेवा केली, यासाठीच या गावाला मी दीपावली हे नाव देतो'. त्या क्षणापासून राजानं या गावाला नवी ओळख दिली आणि दीपावली नावारुपास आलं. 


अधिक वाचा : Video :  तब्बल 418.42944 किमी दुरून आल्या दिवाळीच्या शुभेच्छा; सुनीता विलियम्सचा अंतराळातून तुमच्यासाठी खास मेसेज


दिवाळीच्या दिवशी या गावातील मंडळी पहाटे उठून पूजा आणि पित्रृकर्म करतात. नवे कपडे घालून पितरांचा आशीर्वाद घेतात. इथं दिवाळीच्या मुहूर्तावर घरात येणाऱ्या जावयाचं खास स्वागत केलं जातं. विशेष रितीरिवाजानं हे स्वागत केलं जातं. साधारण 1000 लोकसंख्या असणाऱ्या या लहानशा खेडेगावात नागरिक अगदी गुण्यागोविंदानं राहतात. एका लहानशा प्रसंगावरून या गावाला जगभरात नावाजलं जाण्याचा किस्सा कायमच लक्ष वेधणारा ठरतो. असं हे एक अनोखं गाव.... दीपावली!!!