नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना (Government Employees) बोनस जाहीर झाला आहे. त्यात आता केंद्र सरकारने (Central Government) रेल्वे कर्मचाऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (diwali bonus union cabinet has decided to give bonus of 78 days to railway employees)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे कर्मचाऱ्यांना तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसचा निर्णय घेण्यात आला.  रेल्वेने 78 दिवसांच्या पगाराच्या समतुल्य उत्पादकता लिंक्ड बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.


पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 7 हजार रुपये बोनस म्हणून दिले जातात. कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या हिशोबाने बोनसची रक्कम म्हणून 17 हजार 951 रुपये दिले जातील. याचा फायदा रेल्वेच्या सुमारे 11 लाख 27 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामुळे रेल्वेवर 1 हजार 832.09 कोटींचा बोजा पडू शकतो.


रेल्वेने गेल्या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला होता. रेल्वे कर्मचार्‍याला 30 दिवसात 7 हजार रुपये बोनस मिळतो. अशा परिस्थितीत, त्या कर्मचाऱ्याला 78 दिवसांसाठी सुमारे 17 हजार 951 रुपये बोनस मिळेल.


मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय


दरम्यान केंद्र सरकारने तेल कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. महागड्या गॅसपासून दिलासा देण्यासाठी  हा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत तेल कंपन्यांना 22 हजार कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.