पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात सुरुच
सर्वसामान्यांना खरंच मिळतोय का दिलासा?
मुंबई : दिवाळीचा सण आणि एकंदर उत्साहाचं वातावरण पाहता याच वातावरणात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कपात पाहायला मिळत आहे.
मंगळवारी सकाळी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये १४ पैशांनी, तर डिझेलच्या दरांमध्ये ९ पैशांनी कपात झाल्याचं पाहायला मिळालं. तर मुंबईतही हे दर खाली घसरल्याचं स्पष्ट होत आहे.
एएआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुंबईत पेट्रोल १४ पैसे, तर डिझेल १० पैशांनी स्वस्त झालं आहे. सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल ७८ रुपये ४२ पैसे प्रति लिटर तर डिझेल ७३ रुपये ०७ पैसे प्रति लिटर इतक्या दरात उपलब्ध आहे. तर मुंबईत पेट्रोल ८३ रुपये ९२ पैसे आणि डिझेल ७६ रुपये ५७ पैसे प्रति लिटर इतक्या किंमतीवर पोहोचलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरांमध्ये होणारी ही कपात सामान्यांना दिलासा देण्यात मात्र अपयशी ठरत आहे हेसुद्धा तितकच खरं.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या हालचाली आणि त्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होणारे परिणाम आणि त्याची चढउतार पाहता सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. तेव्हा आता सण- उत्सवांच्या या दिवसांमध्ये हे दर आणखी कमी होणार, की वाढणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे.