DJ Azex Death: प्रसिद्ध DJ Azex चा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ, कुटुंबीयांनी दरवाजा उघडला अन् धक्काच बसला
DJ Azex Suicide: ओडिशामधील प्रसिद्ध DJ Azex उर्फ अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा त्याच्याच घरात मृतदेह सापडल्यानंतर खळबळ माजली आहे. भुवनेश्वरमधील (Bhuvaneshwar) त्याच्या घरी गळफास घेत त्याने आपलं जीवन संपवलं अशी प्राथमिक माहिती आहे. त्याच्या मृत्यूनंतर चाहत्यांना धक्का बसला असून, कुटुंबीयही धक्क्यात आहेत.
DJ Azex Suicide: ओडिशामधील प्रसिद्ध DJ Azex उर्फ अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 19 मार्चला त्याच्या भुवनेश्वरमधील (Bhuvaneshwar) घरात संशयास्पदरित्या त्याचा मृतदेह सापडला आहे. त्याच्या निधनाची बातमी पसरताच चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु आहे. त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही, पण गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
DJ Azex बाहेर येत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांना शंका आली. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून पाहिलं असता, त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं आढळलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं याची माहिती पोलीस घेत आहेत.
प्राथमिक तपासात, DJ Azex ने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्याच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, "शनिवारी रात्री ढग गडगडत असल्याने वीज गेली होती त्यावेळी Azex त्याच्या रुममध्ये होता. आम्ही रात्री 10 वाजता त्याला बोलवण्यासाठी गेलो होतो. पण त्याचा दरवाजा बंद होता. आम्ही दरवाजा तोडला असता त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता". त्याने रुममध्ये जाऊन दरवाजा बंद केला तेव्हा घऱात इतर कुटुंबीयही होते.
यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर त्याच्या काकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
प्रेयसीवर संशय
Azex चे काका भोलानाथ मोहरना यांनी त्याच्या प्रेयसीवर संशय व्यक्त केला आहे. त्याची गर्लफ्रेंड त्याच्याकडे वारंवार पैसे मगात होती. काही व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून त्याचा मानसिक छळ सुरु होता असा दावा मित्राने केला आहे. अक्षयच्या कुटुंबाने याप्रकरणी सविस्तर तपास करण्याची मागणी केली आहे.