Karnataka DCM DK Shivkumar Statement: कर्नाटकमधील निवडणुकीमध्ये (Karnataka Election) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अखेर काँग्रेसचे नेते सिद्धरमैय्या (Siddaramaiah) यांनी शनिवारी बंगळुरुमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर काँग्रेसचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (DCM DK Shivkumar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिवकुमार यांनी एक मोठं विधान केलं आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना कोणीही आपल्या घरी येऊ नये असं म्हटलं आहे.


सिद्धरमैय्यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन भाजपाला केलं लक्ष्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सिद्धरमैय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी बंगळुरुमधील केपीसीसीच्या कार्यालयामध्ये जाऊन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतींना उजाळा दिला. राजीव गांधींच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी दहशतवादाच्या गोष्टी करतात. भाजपाच्या कोणत्याही व्यक्तीने दहशतवादामुळे आपला प्राण गमावलेला नाही. आम्ही दहशतवाद्यांचं समर्थन करतो असा आरोप भाजपा करते. मात्र इंदिरा गांधी, राजीव गांधींसारखे काँग्रेसचे अनेक नेत्यांनी दहशतवादी हल्ल्यांमध्ये प्राण गमावले आहेत, असं सिद्धरमैय्या यांनी भाषणात म्हटलं. यावेळी शिवकुमार यांनीही भाषण केलं. पण त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या घरी न येण्याचं आवाहन केलं. यामागील कारणही त्यांनी सांगितलं.


घरी येऊ नका असं शिवकुमार का म्हणाले?


"विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला 135 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र या विजयाने मी समाधानी नाही. माझ्या किंवा सिद्धरमैय्यांच्या घरी कोणीही येऊ नये. आपलं पुढील लक्ष्य लोकसभा निवडणुकीचं आहे. ही निवडणूक आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने लढायची आहे," असं शिवकुमार यांनी भाषणामध्ये म्हटलं. कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रचाराची धुरा संभाळताना शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली 10 मे रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये 224 सदस्य असलेल्या विधानसभेतील 135 जागा काँग्रेसने जिंकल्या. या विजयाचं श्रेय शिवकुमार यांनी केलेला प्रचार, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मदतीने पक्षाचा वचननामा आणि काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं यासारख्या गोष्टींना दिलं जात आहे. त्यामुळेच शिवकुमार यांचं नाव अगदी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही होतं. मात्र त्यांनी अनेक दिवस पक्षश्रेष्ठींबरोबर झालेल्या चर्चांनंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकरण्यास होकार दिला.


अनेक वर्षांपासून संकटमोचक


शिवकुमार यांना मागील अनेक वर्षांपासून संकटाच्या प्रसंगी पक्षासाठी धावून येणारे नेते म्हणून ओळखलं जातं. 61 वर्षीय शिवकुमार हे 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते पक्ष संघटनेच्या बांधणीबरोबरच पक्षश्रेष्ठींचे विश्वासू मानले जातात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख असताना झालेली विश्वासमत चाचणी असो किंवा गुजरातमधून अहमद पटेल यांनी राजस्यसभेची निवडणूक लढणं असो शिवकुमार यांनी कायमच पक्षातील आमदार फुटणार नाही याची काळजी पक्षाच्यावतीने घेतली. 


विरोधकांची एकजूट


शिवकुमार यांनी आता कर्नाटक निवडणुकीतील विजयानंतर उपमुख्यमंत्री म्हणून मला किंवा मुख्यमंत्री झालेल्या सिद्धरमैय्या यांना भेटण्यास न येण्याचं आवाहन आपल्या समर्थकांना केलं. आपल्याला अजून लोकसभेची मोठी लढाई लढायची असून त्यासाठीची तयारी सुरु करण्याचे संकेत शिवकुमार यांनी दिले. सिद्धरमैय्या आणि शिवकुमार यांच्या शपथविधीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीला विरोध करणाऱ्या पक्षांची एकजूट शनिवारी बंगळुरुमध्ये दिसून आली. विरोधी पक्षातील वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.