मोठी बातमी: पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना `डीएमके`चा पाठिंबा
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेससह दक्षिणेतील प्रमुख पक्षांनी चेन्नईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
चेन्नई: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेससह दक्षिणेतील प्रमुख पक्षांनी चेन्नईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मी तामिळनाडूतून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव सूचवत आहे. राहुल यांच्यात नरेंद्र मोदींसारख्या फॅसिस्ट नेत्याला हरवण्याची क्षमता असल्याचे यावेळी स्टॅलिन यांनी सांगितले. यावेळी स्टॅलिन यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडेही काढले. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात देश १५ वर्षे मागे फेकला गेला आहे. आपण त्यांच्या हातात पुन्हा सत्ता दिली तर देश ५० वर्षे मागे जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या हुकूमशहासारखे वागतात. त्यामुळेच लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आल्याचे त्यांनी म्हटले.
चेन्नईतील द्रमुकच्या मुख्यालयात रविवारी पक्षाचे माजी सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याचे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला राहुल गांधी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पुददुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, अभिनेते रजनीकांत आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा आदी नेते उपस्थित होते.
या कार्यक्रमात राहुल गांधी यांनीदेखील जनसुमदायाला संबोधित केले. त्यांनी म्हटले की, एम. करुणानिधी यांनी नेहमीच देशातील संस्थांचे रक्षण केले. सध्याच्या काळातील सरकार नागरिकांचा आवाज, संस्कृती आणि देशातील संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत आपण करुणानिधी यांचे स्मरण करून एकत्र आले पाहिजे व भाजपला पराभूत करायला हवे, असे असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.