नवी दिल्ली : असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार प्रादेशिक पक्षांच्या संपत्तीबाबत धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. या अहवालानुसार देशभरातील प्रादेशिक पक्षांपैकी तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाकडे सर्वाधिक संपत्ती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एडीआरने जाहीर केलेले हे आकडे २०१५-१६ या कालावधीतील आहेत. या काळात करूणानिधी यांच्या डीएमकेकडे ७७.६३ कोटी रूपए इतकी मालमत्ता होती. जी देशातील सर्व राजकीय पक्षांपेक्षा अधिक आहे. तर, डीएमके खालोखाल दिवंगत जयललीता यांच्या एआयएडीएमके या पक्षाचा क्रमांक लागतो. या पक्षाकडे याच काळात ५४.९३ कोटी इतकी संपत्ती जमा झाली. तिसरा क्रमांक चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचा आहे. तेलगू देसमकडे १५.९७ कोटी इतकी संपत्ती जमा झाली.


एडीआरच्या अहवालानुसार, २०१५-१६ या काळात सुमारे ३२ प्रादेशिक पक्षांकडे असलेली एकूण संपत्ती ही २२१.४८ कोटी इतकी होती. या पैकी या पक्षांनी तब्बल १११.४८ कोटी रूपये खर्च केले. तर, ११० कोटी रूपयांची रक्कम ही खर्च न होता शिल्लख राहिली. दिल्लीस्थित एका संस्थेने म्हटले आहे की, सुमारे ४७ राजकीय पक्ष असे आहेत ज्यांनी आतापर्यंत आपल्या निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला नाही. 


एडीआरने म्हटले आहे की, सर्वच राजकीय पक्षांना आपले वार्षिक लेखापरिक्षण केलेल्या खात्याचा अहवाल सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत होती. दरम्यान, सर्वाधिक खर्च करणाऱ्या प्रादेशिक पक्षांमध्ये नितीश कुमार यांच्या जदयूचा क्रमांक सर्वात वरचा आहे. जदयूने निवडणुकांवर २३.४६ कोटी रूपये खर्चे केले आहेत. तेलगू देसम दुसऱ्या क्रमांकावर असून, या पक्षाने १३.१० कोटी रूपये  तर, केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ११.०९ कोटी रूपये निवडणुकांवर खर्च केले आहेत.