नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने मंगळवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं की, देशात पुढील २ दिवस रॅपिड टेस्ट किटने कोरोनाची तपासणी होणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीएमआर संस्थेचे डॉ. रमन गंगाखेडकर यांनी सांगितलं की, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये रॅपिड टेस्ट घेतल्या जात आहेत, ज्यांचे रिझल्ट हे वेगवेगळे येत आहेत. जे योग्य वाटत नाही, याचा विचार करून आयसीएमआर आपल्या टीम त्या ठिकाणी पाठवत आहेत. 


तसेच राज्यांनाही सल्ला देण्यात येत आहे की, राज्यांनी देखील रॅपिड टेस्ट किटचा वापर पुढील २ दिवस करू नये.


रॅपिड टेस्ट किट कशा वापरल्या जात आहेत, किंवा नेमकं काय होतंय, याची संपूर्ण चौकशी केल्यानंतरच आयसीएमआर रॅपिड टेस्ट किटविषयी पुढील सूचना देणार आहे.


डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं की, देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे ४ लाख ४९ हजार ८१० टेस्ट झाल्या आहेत. सोमवारी ३५ हजार टेस्ट झाल्या.


आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, मागील २४ तासात कोरोना व्हायरसने बाधित असलेले ७०५ लोक बरे झाले, देशात आतापर्यंत ३ हजार २५२ लोक ठिक झाले आहेत.


देशात सोमवारी एकूण १३३६ लोकांना संक्रमण झाले आहे, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता १८ हजार ६०१ वर गेला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत ५९० लोकांचा मृत्यू झाला आहे.


देशात आतापर्यंत ६१ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसात कोरोना व्हायरस संक्रमणाचा एकही रूग्ण आलेला नाही.