Chandrayaan-3 : चंद्राला गवसणी घालणाऱ्या यशामागे तब्बल 20 वर्षांची मेहनत आहे. सलाम त्या शास्त्रज्ञांना, संशोधकांना आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या प्रत्येकाला.  तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपयींनी (Atal Bihari Vajpayee) 2003 मध्ये स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन चांद्रयान 1 (Chandrayaan-1) मोहिमेची घोषणा केली होती.  2003 नंतर चांद्रयान मोहिमेवर काम सुरू झालं. 22 ऑक्टोबर 2008 ला सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान 1 लॉन्च झालं. नोव्हेंबर 2008 मध्ये हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. याच मोहिमेमुळे चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते, त्याला नासानंही पुष्टी दिली. चांद्रयान 1 मोहिमेअंतर्गत चांद्रयान एक वर्षं चंद्राच्या कक्षेत राहिल आणि त्यानं कक्षेत 3400 फेऱ्या मारल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयान 2 (Chandrayaan-2) मोहिमेने शास्त्रज्ञांची परीक्षा पाहिली. सात सप्टेंबर 2019 ला मध्यरात्री अडीच वाजता श्रीहरिकोटामधल्या (Sriharikota) स्पेस सेंटरमधली निराशा आणि शांतता सगळ्या देशानं पाहिली.  शास्त्रज्ञांच्या 11 वर्षांच्या मेहनतीनंतर आणि 47 दिवसांच्या प्रवासानंतर विक्रम लँडर क्रॅश झालं होतं. पण याच अश्रूंमधून इस्रोनं पुन्हा गगनभरारी घेतली. आणि पुढच्या चार वर्षांतच चांद्रयान ३ चंद्राकडे झेपावलं. अशक्य अशा समजल्या जाणाऱ्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगचं आव्हान भारतानं स्वीकारलंय. 


चांद्रायन-3 समोरची आव्हानं
पृथ्वीपासून चंद्र चार लाख किलोमीटर दूर आहे. मंगळापेक्षाही चंद्रावर लँड करणं कठीण आहे. चंद्रावर वायुमंडळ नाही  प्रचंड अंधार असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत चांद्रयान उतरवणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चंद्रावर चांद्रयान उतरेल..... आणि भारत विज्ञानाच्या क्षितिजावर नवा ठसा उमटवेल.


चांद्रायन-3 चं यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर २ वाजून ३५ मिनिटांनी रॉकेट चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर १६ व्या मिनिटाला LVM-3 रॉकेटनं 179 किलोमीटरच्या प्रवासानंतर चांद्रयानाला अवकाशात सोडलंय पुढचा प्रवास चांद्रयान करणार आहे. पुढच्या काही दिवसांत यानाचा पृथ्वीभोवतीच्या कक्षेत संचार होईल. मग चंद्राजवळच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत यान स्थिरावेल. 23-24ऑगस्ट दरम्यान लँडर चंद्रावर उतरेल . 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल. साधारणपणे पाच ऑगस्टच्या दरम्यान चंद्राच्या कक्षेत चांद्रयानाचा प्रवेश होईल. 23 ऑगस्टला चांद्रयानाची गती कमी होईल. 


चांद्रयान ३ मोहिमेत चूक होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आलीय. भारत जमिनीवरची ताकद वाढवण्याबरोबरच अवकाशातही दबदबा वाढवायला सज्ज झालाय.