रुग्णालयाच्या Operation Theatre मध्ये डॉक्टरचं Pre Wedding Shoot; व्हिडीओ समोर आला अन्...
Pre Wedding Shoot In Operation Theatre: हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून अनेकांनी या जोडप्यावर टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडीओमध्ये हे प्री-वेडिंग शूट करण्यासाठी ऑप्रेशन थेअटरमध्ये आलेले फोटोग्राफर्सही दिसत आहेत.
Pre Wedding Shoot In Operation Theatre: लग्नापूर्वीचं फोटोशूट करण्याचा मोह एका भावी डॉक्टर दांपत्याला चांगलाच महागात पडला आहे. कर्नाटमधील चित्रदुर्ग येथील एका रुग्णालयामध्ये चक्क ऑप्रेशन थेअटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करण्यात आलं. यासंदर्भातील फोटो समोर आल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं असून या डॉक्टर दांपत्याला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. मात्र हा सारा प्रकार खरोखरच फार आश्चर्यकारक आणि तितकाच संतापजनक असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
चित्रदुर्गमधील ब्रम्हसागर परिसरातील जिल्हा रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीने डॉक्टर अभिषेक यांना नियुक्त करण्यात आलं आहे. डॉ. अभिषेक यांनी याच सरकारी रुग्णालयातील ऑप्रेशन थेअटरमध्ये प्री-वेडिंग शूट केलं. या शूटमध्ये त्यांनी ऑप्रेशन सुरु असल्याचं दाखवत अगदी रुग्णही दाखवला होता. या व्हिडीओमध्ये डॉ. अभिषेक शस्त्रक्रीया करताना दिसत आहे. तर डॉ. अभिषेक यांची जोडीदार त्यांना मदत करणारी सहाय्यक दाखवण्यात आली आहे. या फोटोशूटमध्ये संपूर्ण वैद्यकीय पद्धतीची थीम ठेवण्यात आली होती. व्हिडीओच्या शेवटी रुग्ण उठून बसतो असं दाखवण्यात आलं आहे.
थेट आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल
या व्हिडीओमध्ये प्री-वेडिंग फोटोशूटच्या कॅमेरामागील व्यक्तींचीही काही दृष्य दिसत आहेत. मेकिंगचा व्हिडीओ तयार करण्यासाठी शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओत ऑप्रेशन थेअटरमध्ये काही फोटोग्राफर्स आणि त्यांना सहाय्य करणारे असिस्टंट दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी डॉ. अभिषेक यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
हे सहन करता येणार नाही
"चित्रदुर्गमधील ब्रम्हसागर परिसरातील जिल्हा रुग्णालयामध्ये ऑप्रेशन थेअटरमध्ये प्री-वेडिंग शूट करणाऱ्या डॉक्टरला सेवेमधून निलंबित करण्यात आलं आहे. सरकारी रुग्णालये ही लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उभारण्यात आली आहेत. या हॉस्पीटलचा वापर खासगी कामांसाठी करता कामा नये. डॉक्टरांकडून अशापद्धतीची बेजबाबदार वागणूक मी सहन करु शकत नाही," असं दिनेश राव यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्वीटरवरुन ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
सरकारी रुग्णालयातील सेवा या...
"आरोग्य सेवेमध्ये कंत्राटीपद्धतीने काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांनी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी सरकारी नियमांप्रमाणे पार पाडावी. या नियमांनुसारच त्यांनी काम करावं. मी यापूर्वीच सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना इशारा देताना अशाप्रकारे सरकारी रुग्णालयाचा गैरवपार होता कामा नये असं सांगितलं आहे. प्रत्येकाने केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये दिलेल्या सुविधा या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरवल्या जातात," अशी आठवण दिनेश राव यांनी करुन दिली आहे.