2000 Rupees Currency Note : दोन दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2000 च्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांमध्ये त्या बदलून घेण्याची घाई सुरु झाली आहे. 2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे. तसेच दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी वीस हजार रुपयांची मर्यादा आखण्यात आली आहे. पण आता जर तुम्ही बॅंकेमध्ये या नोटा बदलण्यासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) यासंदर्भात एक परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआय बॅंकेमध्ये आयडी प्रूफशिवाय 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या नोटांसह बदलू शकता येणार आहेत. यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या पत्रात याबाबत माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने रविवारी सांगितले की ग्राहक त्यांच्या 2,000 मूल्याच्या नोटा कोणत्याही रिक्विजेशन स्लिप न घेता बदलू शकतात. तसेच, नोटा बदलण्याच्या वेळी  कोणताही ओळखीचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही.


त्यामुळे बँकेत रक्कम जमा करताना कोणताही अतिरिक्त फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. तुम्ही सामान्य नियमांनुसार पूर्वीप्रमाणेच रक्कम जमा करू शकाल. ज्या ग्राहकांचे बँक खाते नाही ते देखील शाखेत जाऊन 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकतील. त्याच वेळी, ज्या ग्राहकांना फक्त पैसे जमा करायचे आहेत त्यांनी केवायसी नियमांचे पालन करावे लागणार आहे.



आरबीआयने लोकांना त्यांच्या खात्यात 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी बँकेमध्ये येण्यास सांगितले आहे नागरिक 23 मे ते 30 सप्टेंबर पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोटा बदलू शकतात. आरबीआयची देशभरात 31 ठिकाणी प्रादेशिक कार्यालये आहेत. पण 2000 रुपयांच्या नोटा अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर नवी दिल्ली, दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरममध्ये बदलता येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे.


म्हणजेच बँका आता ग्राहकांना 2000 च्या नव्या नोटा देणार नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत आरबीआय हळूहळू बाजारातून 2000 च्या नोटा काढून घेईल. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 2,000 रुपयांच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या आणि त्यांचे अंदाजे चार-पाच वर्षांचे आयुष्य संपण्याच्या जवळ आहे.