`कुत्ता गोळी`नं तरुणाई पिसाळली? काय आहे हे प्रकरण वाचा
`डॉग टॅबलेट किंवा कुत्ता गोळी`नं यंत्रणांची डोकेदुखी वाढवली आहे.
मुंबई : अमली पदार्थांची तस्करी हा देशातल्या यंत्रणांसमोर कायमची डोकेदुखी असते. स्मगलर्स नवनव्या नावाने आणि अनेक क्लुप्त्या लढवून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आता नव्याने आढळलेल्या कुत्ता गोळीचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी यंत्रणांना चकवा देण्यासाठी ड्रग माफिया वेगवेगळी शक्कल लढवत असतात. विविध नावांनी अमली पदार्थ बाजारात आणले जातात आणि तरुणांना जाळ्यात ओढलं जातं. 'डॉग टॅबलेट किंवा कुत्ता गोळी'नं यंत्रणांची डोकेदुखी वाढवली आहे.
ही गोळी घेतल्यानंतर शरीर सुन्न होतं. त्यानंतर शारिरीक किंवा मानसिक दुःखाचा विसर पडतो. गोळीतलं केमिकल थेट मेंदूवर आघात करतं. त्यामुळे झोप येते.
मात्र कुत्ता गोळी घेतलेल्या व्यक्तीला झोप लागली नाही, तर तो हिंसक होतो. तसंच त्याचं मानसिक संतुलन कायमचं बिघडण्याचीही भीती असते. डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय ही गोळी घेणं जीवघेणं ठरू शकतं.
ही कुत्ता गोळी वेगवेगळ्या पॉवर कपॅसिटीमध्ये उपलब्ध आहे. ड्रग माफियांनी त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. डॉबरमॅन, बुलडॉग, जर्मन शेफर्ड अशा विविध टोपणनावांनी या गोळ्या ओळखल्या जातात. तसंच क्वांटिटीसाठीही वेगवेगळी कोडनेम देण्यात आली आहेत.
सुरूवातीला या गोळीची किंमत कमी ठेवण्यात आली. आधी 10 गोळ्यांची ट्रीप 20 रुपयांना मिळायची. मात्र तरुणाईला एकदा जाळ्यात ओढल्यानंतर आता दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत स्ट्रीप विकली जातेय. कुत्ता गोळीमुळे तरुणाई पिसाळण्याचा धोका आहे. तपास यंत्रणांनी वेळीच या कुत्र्याला साखळीत अडकवायला हवं