नोकरी सोडताना किंवा बदलताना `या` चुका करू नका? अन्यथा होईल मनस्ताप
नोकरी सोडताना किंवा बदलताना प्रत्येक निर्णय सावधगिरीने घेणं गरजेचं आहे.
मुंबई: खासगी कंपनीत नोकरी करत असाल, तर काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नोकरी सोडताना किंवा बदलताना प्रत्येक निर्णय सावधगिरीने घेणं गरजेचं आहे. आर्थिक, वैयक्तिक किंवा इतर कारणांमुळे सध्याची नोकरी सोडण्याचा विचार करतो. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नोकरी बदलणे आवश्यक आहे, पण जुनी नोकरी सोडताना नेहमी 'हॅपी नोट'वर सोडणं आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही नोकरी सोडत असाल किंवा काही कारणास्तव सोडावे लागत असेल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
कंपनीतील स्वत:ची प्रतिमा जपा
तुम्ही कोणत्याही कंपनीत काम करत असलात तरी तुमची प्रतिमा जपावी. कंपनी सोडून तुम्ही निघून जाता तेव्हा तुमची प्रतिमा नकारात्मक ठेवू नका. कारण पुन्हा कंपनी काम करण्याची वेळ आली तर अडचण येऊ शकते. या काळात निष्ठेने काम करा. तुमच्यावर दिलेली कोणतीही जबाबदारी अर्धवट सोडून जाऊ नका.
बॉसशी संपर्क ठेवा
तुम्हाला नोकरी मिळवून देण्यात बॉसची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे नोकरी करताना आणि बाहेर पडतानाही बॉससोबतचे नाते चांगले ठेवा. केवळ इमेलद्वारे नोकरी सोडत असल्याचे कळवल्यास बॉसच्या मनात तुमच्याविषयी चुकीची भावना निर्माण होऊ शकते. तुम्ही तुमच्या बॉसशी स्वत: बोलून नोकरी का सोडत आहात ते समजावून सांगा. नोकरी सोडल्यानंतर जुन्या कंपनीतील बॉसशी संपर्क तोडू नका. कारण भविष्यात त्यांची मदत मिळू शकते.
भविष्यातील नियोजन
नोकरी सोडताना तुम्ही तुमच्या भविष्यातील योजनांबद्दल कधीही कुणाशी बोलू नका. याशिवाय तुम्ही ज्या कंपनीत जाणार आहात, त्याबद्दलही कोणशी जास्त चर्चा करू नका. कोण कोणत्या मार्गाने तुमचं नुकसान करेल सांगता येत नाही. आजकाल बऱ्याच कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांचं बॅकग्राउंड जाणून घेण्यासाठी पूर्वीच्या कंपनीशी संपर्क साधतात.
राजीनामा
प्रत्येक कंपनीचा नोटीस पिरीयड असतो. नोटीस पिरीयड डोळ्यासमोर ठेवून राजीनामा द्यावा. नोकरी सोडताना तुम्ही तुमची वागणूक योग्य ठेवली नाही, तर तुम्हाला त्याचा फटका सहन करावा लागू शकतो. कंपनी तुमच्यावर कठोर कारवाई करू शकते आणि तुमची NOC किंवा रिलीझ लेटर थांबवू शकते.
कंपनीच्या वस्तू परत करा
तुम्ही कंपनीकडून ज्या काही वस्तू घेतल्या असतील त्या नक्कीच परत करा. कंपनीची कोणतीही वस्तू तुमच्या ठेवण्याचा प्रयत्न करू नका. अनेक कंपन्या आयडी कार्ड, पेन ड्राइव्ह, लॅपटॉप इ. नेण्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे नोकरी सोडताना कंपनीच्या वस्तू परत करा.