नवी दिल्ली : शिवस्मारकाचे काम थांबवावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयानं तशी नोटीस दिली आहे. २ आठवड्यात केंद्र आणि राज्य सरकार या नोटीशीला उत्तर देणार आहे. पर्यावरण परवानग्या योग्य पद्धतीनं मिळाल्या नसल्याचा दावा कन्झर्वेशन अॅक्शन ट्रस्टनं केला होता. यासंदर्भात तशी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्ययालयानं ही नोटीस दिली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगई आणि संजय कृष्ण कौल यांच्या खंडपीठापुढे या याचिकेची सुनावणी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवस्मारकासाठीच्या पर्यावरण परवानग्या घेण्यात न आल्यामुळे कन्झर्वेशन अॅक्शन ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका प्रलंबित असताना उच्च न्यायालयानं अंतरिम मनाई हुकूम दिला नाही, त्यामुळे ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.


शिवस्मारकाची वैशिष्ट्ये


गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या १६.८६ हेक्टर आकाराच्या खडकावर हे शिवस्मारक उभारलं जाणार आहे. चौपाटीपासून ही जागा ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे. या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणाहुन बोटीच्या  सुविधा उपलब्ध असणार आहे. एकाच वेळी जास्तीत जास्त दोन हजारपेक्षा जास्त पर्यटकांना सामावून घेण्याची या स्मारकाची क्षमता असणार आहे.


स्मारकात प्रवेश केल्यावर राज्याची कुलदैवत आणि छत्रपती यांचे आदरस्थान असलेल्या तुळजाभवानीचे भव्य मंदिर असणार आहे...  त्यांनतर शिवाजी महाराज यांच्या जन्मापासूनचे राज्याभिषेकापर्यंत घटना दाखवणारे प्रत्यक्ष जिवंत देखावे साकारले जाणार आहेत. त्यानंतर शिवकाल उलगडवून दाखवणारे मोठे कला संग्रहालय आणि ग्रंथालयही असणार आहे. तसंच या भागांत अँपीथीअटर, साउंड अॅन्ड लाईट शो, थ्री डी आयमॅक्स थिएटर असणार आहे.


छत्रपतींच्या स्मारकाची उंची पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली. मात्र प्रत्यक्ष पुतळ्याची उंची ४४ मीटरने कमी करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीतील स्मारकाच्या सुधारित आराखड्यात पुतळ्याची उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आली आहे.


- पूर्वी पुतळ्याची उंची १६० मीटर होती, ती आता १२६ मीटर करण्यात आली आहे.


- पूर्वी चौथाऱ्याची उंची ३० मीटर होती, ती आता ८४  मीटर करण्यात आली आहे.


- पूर्वी स्मारकाची एकूण उंची १९० मीटर होती ती आता २१० मीटर करण्यात आली आहे.