मायावती विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नाहीत; शिवपाल यादवांचा पुतण्याला सल्ला
मायावती यांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर
लखनऊ: मायावती या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नाहीत. त्यांनी माझ्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, असे वक्तव्य शिवपाल यादव यांनी केले. शिवपाल यादव हे अखिलेश यादव यांचे काका आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर शिवपाल यादव यांनी फारकत घेत नव्या पक्षाची स्थापना केली होती. या सगळ्यामुळे अखिलेश आणि शिवपाल यांच्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला होता. मात्र, आता सपा आणि बसपाने युती केल्यानंतर शिवपाल यादव यांनी आपल्या पुतण्याला एक सल्ला दिला आहे. त्यांनी १९९५ साली झालेल्या गेस्ट हाऊस कांडचा दाखला देताना म्हटले की, अखिलेश यादव यांनी मायावती यांच्यावर विश्वास ठेवू नये. त्यांनी एकेकाळी माझ्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, त्यावेळी मी नार्को टेस्ट देण्याची तयारी दाखविली होती, अशी आठवण शिवपाल यादव यांनी करुन दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीत बसपाला समाजवादी पार्टीपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मायावती अखिलेश यादव यांचा विश्वासघात करतील, असेही शिवपाल यादव यांनी सांगितले.
VIDEO: अरारा खतरनाक.... मायवतींच्या वाढदिवसाच्या केकवर लोक तुटून पडतात तेव्हा...
उत्तर प्रदेशात १९९५ साली सपा आणि बसपा यांनी युती करून सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यावेळी मायावती सरकारमध्ये सहभागी नव्हत्या. कालांतराने दोन्ही पक्षांमधील दुरावा वाढत गेला. तेव्हा मायावती भाजपशी गुप्तपणे संधान साधत असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. अशातच २ जून १९९५ रोजी मायावती यांनी लखनऊ येथील गेस्ट हाऊसवर आमदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी सपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी गेस्ट हाऊसवर हल्ला केला होता. यामध्ये बसपाच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी मायावती एका खोलीत जाऊन लपल्या होत्या. अखेर भाजप आमदार ब्रह्मदत्त द्विवेदी यांनी गेस्ट हाऊसमधून मायावतींना सहीसलामत बाहेर काढले होते.