नवी दिल्ली - पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांवर कारवाई करीत नसल्यामुळेच आम्हाला नियंत्रण रेषा ओलांडून दहशवाद्यांच्या तळांवर कारवाई करावी लागली. यापुढे या स्वरुपाची आणखी कारवाई करण्याचा आमचा कोणताही इरादा नसल्याचे भारताने बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट केले. रशिया, भारत आणि चीन या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही भूमिका मांडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा स्वराज म्हणाल्या, भारतात आणखी दहशतवादी हल्ले करण्याचा कट जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने रचला होता. त्यामुळेच त्यांचे तळ उदध्वस्त करणे आमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे होते. दहशतवाद्यांना धडा शिकवणे एवढाच एकमेव उद्देश भारताच्या हवाई हल्ल्यांमागे होता. यापुढे आणखी हल्ले करण्याचा भारताचा इरादा नाही. आम्ही जबाबदार देश आहोत आणि जबाबदारीने वागणे आम्हाला चांगले जमते, असे त्यांनी म्हटले आहे. पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने स्वीकारली होती. १४ फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. एकाच हल्ल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जवान शहीद होण्याची ही पहिलीच घटना होती. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात भारतीयांच्या मनात चीड निर्माण झाली होती. त्याचबरोबर याचा बदला भारताने घेतलाच पाहिजे, अशीही मागणी सर्वस्तरांतून येऊ लागली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून बालाकोट, चामोटी, मुझफ्फराबादमध्ये घुसून कारवाई केली. सुमारे १००० किलोचे बॉम्ब टाकून दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यात आले. अत्यंत कमी वेळात ही कारवाई करून भारतीय हवाई दलाची विमाने पुन्हा आपल्या हद्दीत परतली होती.  भारताच्या या हल्ल्याने पाकिस्तानला धक्का बसला.


भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांना कोणताही धक्का बसू नये, याचा विचार करूनच हवाई दलाने बालाकोटची निवड केली होती. भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली असून, पाकिस्तानमधील कोणत्याही लष्करी तळावर हल्ला करण्यात आलेला नाही, याकडेही सुषमा स्वराज यांनी लक्ष वेधले आहे.