नवी दिल्ली: देशातील टेलिव्हिजन क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणारे दूरदर्शन लवकरच प्रेक्षकांना नव्या रुपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी प्रसार भारतीकडून दूरदर्शनचा लोगो (बोधचिन्ह) बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर प्रसार भारतीने प्रेक्षकांच्याच मदतीने बोधचिन्ह तयार करायचे ठरवले. त्यासाठी एका स्पर्धेच्या माध्यमातून प्रसार भारतीने प्रेक्षकांकडून बोधचिन्हाची डिझाईन्स मागवली होती. हे बोधचिन्ह नव्या पिढीला भावले पाहिजे. त्याबरोबरच दूरदर्शनचा आतापर्यंतचा समृद्ध वारसाही या बोधचिन्हातून प्रतित झाला पाहिजे, असा प्रसार भारतीचा प्रयत्न होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसार भारतीच्या या स्पर्धेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तब्बल १० हजार बोधचिन्हे प्रसार भारतीकडे पाठवण्यात आली. यामधून सर्वोत्कृष्ट पाच बोधचिन्हांची निवड प्रसार भारतीने केली. ही बोधचिन्हे प्रसार भारतीकडून नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. 



मात्र, यानंतर नेटिझन्सनी नव्या बोधचिन्हांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर दूरदर्शनचे जुने बोधचिन्हच परत आणावे, अशी मागणी अनेकांनी केली आहे. 


१५ सप्टेंबर १९५९ रोजी नवी दिल्लीत दूरदर्शन सुरु झाले होते. यानंतर कित्येक दशके दूरदर्शनवरील दर्जेदार कार्यक्रमांनी देशातील अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले होते. आजदेखील अनेकजण दूरदर्शन आपल्या बालपणाचा अविभाज्य भाग असल्याच्या आठवणी सांगताना दिसतात. त्यामुळे आता प्रसारभारती दूरदर्शनच्या बोधचिन्हाबाबत काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.