डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार
आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणांचे तज्ज्ञ
नवी दिल्ली: डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची शुक्रवारी देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदाचा कार्यभार सांभाळतील. अरविंद सुब्रमण्यन यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी सरकारने ३० जून रोजी अर्ज मागवले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ( एसीसी) डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांचे नाव निश्चित केले.
डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे सध्या हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अॅनालिटिकल फायनान्स विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिकागो-बुथ स्कूलमधून पीएचडी केली आहे. तसेच आयआयटी व आयआयएम या देशातील अग्रगण्य संस्थांमध्येही त्यांचे शिक्षण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणांचे तज्ज्ञ म्हणून डॉ. सुब्रमण्यन यांचा लौकिक आहे.