Viral Video: राजस्थानमधील (Rajasthan) अजमेरमध्ये (Ajmer) आकाशपाळणा कोसळून दुर्घटना झाली आहे. जत्रेदरम्यान आकाशपाळणा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 11 जण जखमी झाले आहेत. केबल तुटल्यामुळे आकाशपाळणा 30 फुटांवरुन खाली कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जत्रेमधील काहीजणांनी कॅमेऱ्यात ही दुर्घटना कैद केली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत सुरुवातीला आकाशपाळणा संथ गतीने सुरु झाल्याचं दिसत आहे. मात्र काही वेळाने आकाशपाळणा वेगाने 30 फूटांवरुन खाली कोसळतो. यावेळी आकाशपाळणा लोकांनी भरलेला होता. 



"दुर्घटनेत 11 जण जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्वजण धोक्याच्या बाहेर आहेत," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. दुर्घटनेचं कारण सांगताना पोलिसांनी, केबल तुटल्याने आकाशपाळणा खाली कोसळला असं सांगितलं आहे. 



अपघातात जखमी झालेल्यांची नावं - 


कोमल (वय 33, रा. वैशाली नगर), वंशिका (13, रा. पहाडगंज), भावेश (14, रा. सिव्हिल लाइन), अर्शीन (12, रा. शीशा खान), गयासुद्दीन (35), हर्षा (18), सोनल अग्रवाल (20), आफरीन (7), नीतू (25), गीतांजली (24), अंशू (37), लक्ष्य (9), कशिश (7), अम्मान (12) यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत.


पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर दोषींविरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 


पंजाबमधील मोहालीमध्ये अशीच एक दुर्घटना गतवर्षी घडली होती. दसऱ्यानिमित्त आयोजित जत्रेत आकाशपाळणा कोसळून 16 जण जखमी झाले होते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता.