Drug Trafficking: हैदराबादमध्ये दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी केलेल्या एका छापामारीमध्ये गांजा तस्करीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. अगदीच हटके पद्धतीने गांजाची तस्करी करताना एका महिलेला अटक करण्यात आली आहे. नानकरामगुडा येथील महिलेला 100 ग्रॅम हळदीच्या पाकिटात अगदी कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने पॅक करून गांजाची विक्री करताना विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं आहे. या महिलेला अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.


कुठे घडला हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नानकरामगुडा येथे अचानक अंमलीपदार्थांची झडती घेण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची धाड पडली. हे धाडसत्र सुरु असताना समोर आलेल्या प्रकारामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही अचंबित झाले. एक टीम किराणा मालाच्या दुकानामध्ये तपासणी करत असताना एका अधिकाऱ्याने चुकून हळदीच्या पाकिटाला स्पर्श केला. मात्र सामान्यपणे पावडरसारखा स्पर्श लागण्याऐवजी या पाकिटात वाळवलेल्या पानांसारखं काहीतरी ठेवल्यासारखं अधिकाऱ्याला वाटलं.


कसा खुलासा झाला?


"सामान्यपणे हळद पावडर ही मऊ असते. मात्र आमच्यातील काही अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान हळदीच्या पाकिटांमध्ये काहीतरी संशयास्पद आढळून आलं. त्यांनी ही पाकिटं फोडून पाहिली असता त्यामध्ये वाळवलेला गांजा सापडला," असं या धाडीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्याने सांगितलं. यानंतर अधिकाऱ्याने लगेच या दुकानाची मालकीण नेहा भाई या 25 वर्षीय तरुणीला अटक केली.


या महिलेकडे कसा आला गांजा?


उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणीमध्ये नेहाचे कुटुंबीय तिला हा माल आणून देत होते. हा माल आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमाभागातून तस्करी करुन आणला जात होता. हा माल वेगवेगळ्या माध्यमातून वितरित केला जायचा. नेहा ही स्वत: ग्राहकांना गांजा विजायची. वरवर दिसणारं हे हळदीचं एक पाकीट नेहा 6 हजार रुपयांना विकायची. यामध्ये 10 ग्राम गांजा असायचा. नेहाचा मूळ व्यवसाय किराणामालाचा आहे. मात्र तिने 'माल' विकण्याच्या या उद्योगामध्ये एका एजंटच्या माध्यमातून रस दाखवला आणि ती सुद्धा अंमलीपदार्थ विकू लागली.


पोलिसांनी काय माहिती दिली?


यासंदर्भात 'डेक्कन क्रॉनिकल'ने दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधला असता या विभागाचे निर्देश व्ही. बी. कमलहसन रेड्डी यांनी या प्रकरणाची तपासणी सुरु असल्याचं सांगितलं. अशाप्रकारे गांजाविक्रीमध्ये अजून कोण सहभागी आहे याचा शोध घेतला जात आहे. अशाप्रकारे लहानमोठ्या स्तरावरही अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना शोधून काढू असा इशारा विभागाने दिला आहे.