नव्या वर्षात टीव्ही चॅनेल्स पाहण्याचे नियम बदलणार, वाचा काय आहेत बदल
नव्या नियमाप्रमाणे ज्या वाहिन्या बघायच्या आहेत, केवळ त्यांचेच पैसे आता ग्राहकांना द्यावे लागणार आहे.
नवी दिल्ली - डीटीएच किंवा केबलच्या साह्याने घरात वेगवेगळ्या वाहिन्या बघणाऱ्यांसाठी नववर्षांत दोन नवे नियम लागू होत आहेत. यामुळे टीव्ही मनोरंजनावरील खर्च वाढण्याची शक्यता आहे. नव्या नियमाप्रमाणे ज्या वाहिन्या बघायच्या आहेत, केवळ त्यांचेच पैसे आता ग्राहकांना द्यावे लागणार आहे. ठराविक पैसे दिले की सगळ्या वाहिन्या दिसणार असे आता होणार नाही. ग्राहकांना एकतर हव्या असलेल्या वाहिन्या निश्चित करून त्याचे पैसे द्यावे लागतील किंवा एखाद्या कंपनीच्या सर्व वाहिन्या घेण्यासाठी पैसे द्यावे लागतील. ग्राहकांना जे योग्य वाटेल, त्याप्रमाणे ते निर्णय घेऊ शकतात.
एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दूरसंचार नियामक प्राधिकरण डीटीएच आणि केबलचालकांसाठी नवी मार्गदर्शक नियमावली आणणार आहे. येत्या १ जानेवारीपासून या नियमावलीची अमलबजावणी होईल. जर ग्राहकांना स्टार इंडियाच्या १३ वाहिन्या बघायच्या असतील तर त्यांना ४९ रुपये द्यावे लागतील.
सध्या लहान शहरांमध्ये २५० ते ३०० रुपये तर मोठ्या शहरांमध्ये हाच खर्च ३५० ते ४०० रुपये येतो. यामध्ये प्रादेशिक वाहिन्यांसह काही हिंदी आणि इंग्रजीही वाहिन्या बघता येतात. पण नव्या बदलामुळे हाच खर्च ४२० ते ४५० होऊ शकतो. ज्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या आणि तुम्ही बघत असणाऱ्या वाहिन्याच दिसतील. जर तुम्हाल एचडी वाहिन्या हव्या असतील, तर हाच खर्च आणखी वाढेल.
मोफत वाहिन्यांनाही पैसा
सध्या तुम्ही एखादे पॅकेज घेतले की त्यासोबत तुम्हाला जवळपास १०० वाहिन्या मोफत दिल्या जात होत्या. त्याचे वेगळे पैसे आकारले जात नव्हते. पण एक जानेवारीपासून नवा नियम लागू झाल्यावर मोफत वाहिन्या मिळणार नाहीत. त्यासाठीही तुम्हाला पैसे मोजावे लागू शकतात.
एक रुपयात हे चॅनेल
डिस्कवरी जीत, बिग मॅजिक, झी अनमोल, बिंदास, रिश्ते, सोनी पल, लिविंग फूड्स, स्टार उत्सव, मूव्हीज ओके, सोनी मॅक्स-2, झी अॅक्शन, सोनी वाह, झी अनमोल सिनेमा, न्यूज 18 इंडिया, आजतक, एनडीटीव्ही इंडिया, सीएनबीसी आवाज, सीएनएन, एनडीटीव्ही प्रॉफिट, सोनी मिक्स, जिंग, झी ईटीसी बालिवूड, व्हीएच-1, डिस्कव्हरी सायन्स