...अन् लेकीनं थेट दुबईवरुन भारतात राहणाऱ्या आईसाठी पाठवली 10 किलो टोमॅटो
Daughter Sent Tomato To Mother From Dubai: या महिलेने आपल्या भारतात राहणाऱ्या आईला चक्क दुबईवरुन टोमॅटो पाठवल्याची माहिती तिच्या भावानेच दिली असून सध्या या व्यक्तीची पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
Daughter Sent Tomato To Mother From Dubai: पूर्वी कोणी दुबईवरुन येणार असेल तर आयफोन किंवा महागड्या वस्तू आणण्यासाठी लोक सांगायचे. त्यानंतर आजही दुबईवरुन कोणी ओळखीचं येत असेल तर तेथील खजूर, चॉकलेट आणि परफ्यूम आणण्यास सांगितलं जातं. मात्र सध्या दुबईमधील एका महिलेने तिच्या आईसाठी भेटवस्तू म्हणून चक्क टोमॅटो पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेने भारतात असलेल्या आपल्या आईला 10 किलो टोमॅटो पाठवल्याची माहिती या महिलेच्या भावानाची दिली आहे.
परदेशातून टोमॅटो आणा अशी मागणी
भारतामध्ये अनेक शहरांमध्ये टोमॅटोच्या दरांमध्ये (Tomato Rates) अभूतपूर्व वाढ झाली आहे. 20 रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो मागील काही आठवड्यांपासून तब्बल 250 रुपये किलो दरापर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नागपूरमध्येही टोमॅटोच्या दराने 200 रुपये प्रती किलोचा टप्पा ओलांडला आहे. या दरवाढीमुळे हॉटेलपासून मॅक्डॉलन्सपर्यंत अनेक ठिकाणांहून टोमॅटो गायब झालं आहे. रोजच्या वापरातील ही फळभाजी जणू दुर्मिळ झाली आहे. ही दरवाढ इतकी आहे की आता भारतीय लोक आपल्या परदेशातील नातेवाईकांना परदेशातून भेटवस्तू आणण्याऐवजी टोमॅटो घेऊन येण्यास सांगत आहेत.
बरणीत भरुन पाठवली टोमॅटो
असाच एक किस्सा समोर आला आहे. आलीशान वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या दुबईत राहणाऱ्या मुलीने भारतात राहणाऱ्या आईला काय गिफ्ट हवंय असं विचारलं असता आईने 10 किलो टोमॅटो आण असं सांगितलं. या महिलेने खरोखरच तिच्या आईला 10 किलो टोमॅटो पाठवली आहेत. यासंदर्भातील माहिती 'Revs' नावाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. काचेच्या बरण्यांमध्ये भरुन या महिलेने आपल्या आईसाठी दुबईवरुन 10 किलो टोमॅटो पाठवल्याचं या व्यक्तीने अन्य एका ट्वीटमध्ये सांगितलं आहे.
काय म्हटलंय ट्वीटमध्ये?
"माझ्या बहिणीच्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने ती दुबईहून भारतामध्ये येत आहे. तिने तिच्या आईला तुला दुबईवरुन काही हवं आहे का असं विचारलं. माझ्या आईने 10 किलो टोमॅटो आण असं सांगितलं. आता ताईने 10 किलो टोमॅटो एका सुटकेसमध्ये भरून पाठवून दिले आहेत. काय सुरु आहे हे...", असं ट्वीट या व्यक्तीने केलं आहे.
टोमॅटो ट्रकची चोरी
एकीकडे टोमॅटोच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फोडणी बसत असली तरी दुसरीकडे यामुळे शेतकऱ्यांना फार फायदा झाल्याचं दिसत आहे. जुन्नर तालुक्यामधील एक डझनहून अधिक शेतकरी टोमॅटोला मिळालेल्या दरवाढीमुळे कोट्यधीश झाले आहेत. यापौकी एका शेतकऱ्याने तर तब्बल 3 कोटी रुपयांची कमाई या सिझनमध्ये केली आहे. दुसरीकडे अभिनेता सुनील शेट्टीनेही टोमॅटो दरवाढीचा फटका सेलिब्रिटींनाही बसत असल्याचं सांगताना आपण टोमॅटो खाणं कमी केलं आहे असं म्हटलं होतं. यावरुन शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सुनील शेट्टीवर टिका केली होती. यानंतर सुनील शेट्टीने शेतकऱ्यांना दुखावण्याचा हेतू नसल्याचं सांगत माफी मागितली आहे. दुसरीकडे बंगळुरुमध्ये टोमॅटो घेऊन जाणारा एक ट्रक चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या ट्रकमध्ये तब्बल साडेतीन लाख रुपये किंमतीचे टोमॅटो होते अशी माहिती समोर आली आहे.