मुंबई : श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्री महासरस्वती ही दुर्गादेवीची रूपे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवीने मधुकैटभ, महिषासूर, दुर्ग, शुंभ आणि निशुंभ या दुष्ट राक्षसांना ठार मारले. पुराणकारानी सर्व देवीना दुर्गेच्या ठिकाणी एकरूप केले आहे.  देवीने दुर्ग नावाच्या राक्षसाचा वध केलेला पाहून लोक तिला ' दुर्गा ' म्हणू लागले. दुर्गासप्तशतीमध्ये दुर्गेची महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी प्रमुख तीन रूपे असल्याचे सांगण्यात आले आहे. दुर्गेच्या उपासनेचा उगम ऋग्वेदात झाल्याचे आढळून येते. 


( १ ) श्री महाकाली - महाकाली ही महाकालाची संहारक शक्ती मानली जाते. आदिशक्तीच्या तम:प्रधान रौद्र रूपाला 'महाकाली ' म्हणतात. ती दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रकट होते. मधु - कैटभ या  राक्षसांचा नाश करण्यासाठी महाकाली अवतरली असे देवीभागवतात सांगितलेले आहे. एकदा मधु-कैटभ राक्षसानी  ब्रह्मदेवांवर हल्ला केला. ब्रह्मदेव विष्णूंकडे आले.  विष्णू आणि मधु-कैटभ यांचे घनघोर युद्ध झाले. त्यावेळी महामायेने राक्षसांचा बुद्धीभेद केला. त्यामुळे दैत्यानी आत्मनाशाचा मार्ग पत्करला. विष्णूने राक्षसांना मांडीवर घेतले आणि त्यांना ठार मारले. या कार्यात ज्या महामायेने भाग घेतला ती महाकाली होय. महाकालीलाच ' दक्षिणकाली ' असेही म्हटले जाते. तिचे रूप उग्र असले तरी ती आपल्या भक्तांसाठी वरदायिनी होते. तसेच भक्तांचे संरक्षण करते. ही उत्तम शरीरसामर्थाची देवता आहे.


(२) श्री महालक्ष्मी -- श्रीमहालक्ष्मी हे देवीचे एक रूप आहे. हिला दुर्गा, महिषासुरमर्दिनी अशी नावे आहेत. देवीमाहात्म्य या ग्रंथामध्ये तिची अवतारकथा दिलेली आहे. एकदा देव-दानव युद्धात दानवांचा विजय झाला. त्यामुळे दुष्ट महिषासूर हा दानव जगाच्या स्वामी बनला.भगवान विष्णू व शंकर यांच्या मुखातून एक तेज बाहेर पडले. सर्व देवांच्या शरीरातूनही तेज बाहेर पडले. ते तेज एकत्र होऊन त्या दिव्य तेजातून एक स्त्री देवता निर्माण झाली. तिने दुष्ट महिषासुराशी युद्ध करून त्याचा नाश केला. या देवीलाच ' महालक्ष्मी ' किंवा ' महिषासूरमर्दिनी ' म्हणतात. सप्तशती ग्रंथात महालक्ष्मीचे वर्णन केलेले आहे.  कोलासूर राक्षसालाही महालक्ष्मीने ठार मारले. गणपती उत्सवातही श्री महालक्ष्मीचा उत्सव केला जातो. ही धनाची देवता आहे.


( ३ ) श्रीमहासरस्वती - महासरस्वती हे देवीचे एक रूप आहे.  श्रीमहासरस्वतीने चंड-मुंड आणि शुंभ-निशुंभ राक्षसाना ठार मारले. श्रीमहासरस्वती ही सत्वगुणी देवता आहे. ही देवता शाक्तपंथातील आहे. महासरस्वती ही महालक्ष्मीपासून निर्माण झाली असाही एक उल्लेख सापडतो. ही श्वेत वर्णाची आणि चतुर्भुज आहे. देवीच्या या रूपाला महतविद्या,महावाणी, भारती, वाक्, आर्या, ब्राह्मी  इत्यादी नावांनी ओळखले जाते. श्रीविद्यार्णवतंत्रात ही गौरीच्या मुखातून निर्माण झाली असून ती अष्टभुजा असल्याचे म्हटले आहे. ही विद्येची देवता आहे.