`राज्य, केंद्रशासित प्रदेशांना जीवनावश्यक वस्तूंचा अखंडित पुरवठा होणार`
केंद्र सरकारचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक वस्तू व सेवांची सुरळीत, अखंडित पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्क वस्तूंचा पुरवठा सुरुच राहणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
या लॉकडाऊनमध्ये कोणालाही बाहेर फिरण्याची परवानगी नाही. मात्र हे प्रतिबंध लागू करत असताना, उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, वितरण, संग्रहण, व्यापार या विविध प्रतिबंधात्मक अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी या गोष्टींना सूट देण्यात आली आहे.
जीवनावश्क वस्तू सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी, ही तरतूद सर्व वर्गातील लोकांपर्यंत अखंडपणे उपलब्ध करण्यासाठी, आंतरराज्यांमध्ये वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी किंवा अनावश्यक अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक राज्याने हेल्पलाइनसह नियंत्रण कक्ष स्थापित करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासन किंवा पोलिसांशी समन्वय साधण्यासाठी राज्यातील अधिकाची नेमणूक केली जाऊ शकते. अनेक नाशवंत वस्तू असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीत सातत्य ठेवण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.