रमजानच्या काळात मतदान ७ ऐवजी ५ वाजता सुरु करण्याची मागणी
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे दिले आदेश
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील सात पैकी चार टप्प्यांचं मतदान पार पडलं असून उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदान बाकी आहे. याच काळात रमजान देखील सुरु होणार आहे. त्यामुळे या तीन टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळी सातऐवजी पाच वाजल्यापासून सुरू करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.
या जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगानं यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे रमजानच्या काळात मतदानाची प्रक्रिया सकाळी सात ऐवजी पाच वाजता सुरु होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशातलं जवळपास ७० टक्के जागांवरचं मतदान पार पडलं आहे. पुढच्या तीन टप्प्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. २०१४ साली भाजपनं जिंकलेल्या २८२ पैकी ११६ जागांवर पुढच्या तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमधल्या बहुतांश मतदारसंघांचा पुढच्या तीन टप्प्यात समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या ५४३ जागांसाठी ७ टप्प्यामध्ये मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सातव्या टप्प्यात म्हणजेच १९ मेला निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ एप्रिलला घोषित होणार आहे.