अलाहाबाद : उत्तर प्रदेशातील अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर रेल्वे अधिकाऱ्यांसह, रेल्वेत बसलेले प्रवासी आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांसह सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. एकाच वेळी अनेकांवर घाला घालण्यासाठी काळ नजीक आला होता. पण, वेळ चांगली म्हणून मोठी दूर्घटना टळली आणि संकट हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलाहाबाद रेल्वे स्टेशन... नाही म्हटले तरी नेहमीच गजबजलेले ठिकाण. अशा या गर्दीच्या ठिकाणी एकाच ट्रॅकवर एकाच वेळी तीन ट्रेन आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेहमीच सतर्क राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढे काय घडू शकते याची काही क्षणातच कल्पना आली. घटनेचे गांभीर्य ध्यानात येताच रेल्वे प्रशासनाची झोप उडाली. तिन्ही ट्रेन्सना थांबविण्याचे आदेश तत्काळ देण्यात आले.


या घटनेला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही. पण, प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार, अलाहाबाद स्टेशनजवळ दुरंतो एक्स्प्रेस सहित तीन ट्रेन एकाच वेळी ट्रॅकवर आल्या होत्या. हा प्रकार घडत असताना दिल्ली हावडा मार्गावरही रेल्वे अपघात थोडक्यात टळला. या मार्गावरील सराय भूपत आणि जसवंतनगर रेल्वेस्थानकादरम्यान असलेला रेल्वे ट्रॅक मध्येच तुटला होता. ही बाब अधिकाऱ्यांच्या ध्यानात येताच शताब्दी आणि राजधानीसहित इतर ट्रेनही त्वरीत थांबवण्यात आल्या होत्या. काही वेळात ट्रॅकची दुरूस्ती झाली आणि रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाली.



या घटना पाहता रेल्वेच्या मागे लागलेले अडचणींचे शुक्लकाष्ट अद्यापतरी सुटले नसल्याचे चित्र आहे.