Dussehra 2024: भारतातील `या` ठिकाणी रामाचं नाव घेत नाहीत लोक, रावणाची केली जाते पूजा
Baijnath Temple: या ठिकाणी लोक रामचे नाव घेत नाही. एवढंच नाही तर रावणाबद्दल वाईट काहीही बोलले जात नाही आणि ऐकूही घेतले जात नाही.
Himachal Pradesh Kangra Baijnath Temple: आज देशभरात दसरा, विजयादशमी साजरी केली जात आहे. या सणाला आवर्जून श्री रामांची पूजा केली जाते. वाईटावर विजयाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पण भारतात असं एक ठिकाण आहे जिथे दसरा साजरा होत नाही. जिथे लोक रामचे नाव घेत नाही. एवढंच नाही तर रावणाबद्दल वाईट काहीही बोलले जात नाही आणि ऐकूही घेतले जात नाही. इथे लहान मुलांना रामाची नाही तर रावणाची गोष्ट सांगितली जाते. हे ठिकाण आहे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील बैजनाथ येथील. या जागेला रावणाचे निवासस्थानही म्हंटले जाते.
बैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात बैजनाथ नावाचे मंदिर आहे. हे मंदिर हे रावणाचे मंदिर नसून भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहे. परंतु हे मंदिर रावणामुळेच जास्त प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की, या ठिकाणी रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. जेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले नाही तेव्हा रावणाने हवन कुंडात एक एक करून नऊ मस्तक अर्पण केली. यानंतर भगवान शंकर प्रकट झाले आणि रावणाला वरदान मागायला सांगितले. ज्या ठिकाणी रावणाने तपश्चर्या केली होती त्याच ठिकाणी एक मंदिर आहे असे सांगितले जाते.
अजून एक पौराणिक कथा अशी की एकदा रावण हातात शिवलिंग घेऊन बैजनाथहून लंकेला जात होता. पण त्यावेळी काही देवांनी त्याला शिवलिंग त्याच ठिकाणी ठेवण्यास सांगितले. यामुळे शिवलिंग कायमस्वरूपी तिथेच स्थापित राहिले. रावणाने ते हटविण्याचा खूप प्रयत्न केला, तरीही शिवलिंग आपल्या जागेवरून हलले नाही.
साजरा केला जात नाही दसरा
बैजनाथमध्ये दसरा साजरा केला जात नाही, रावण दहनही केले जात नाही. रावणाशी संबंधित कोणतीही बातमी किंवा चित्र टीव्हीवर आले तर येथील लोक टीव्ही बंद करतात. जर चुकूनही कोणी रावण म्हटले तर लोक संतापतात. रावण नाही तर रावण जी बोलावे अशी तिकडच्या लोकांची अपेक्षा असते. इथे सोन्याचे दुकान नाही. कारण असे सांगितले जाते की जो कोणी दुकान उघडतो त्याच्या सोन्याचा रंग शिवलिंगाचा होऊन काळा होतो.
देशाच्या इतर भागात लोक एकमेकांना भेटल्यावर राम-राम म्हणतात, पण बैजनाथमध्ये राम नाव कोणाच्याच ओठावर येत नाही. लोक राम-राम ऐवजी जय शंकर किंवा जय महाकाल म्हणतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)