भोपाळ : आंबे खायला कुणाला आवडत नाहीत. सध्या बाजारात हापूस आंब्यांपासून विविध जातीच्या आंब्यांची चलती आहे. प्रत्येक आंब्याला त्याच्या चवीनुसार दर मिळतो. पण मध्य प्रदेशात एक असा आंबा आहे. ज्याची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. विशेष म्हणजे या आंब्याच्या सुरक्षेसाठी मालकानं जबरदस्त बंदोबस्तही केलाय. झाडाला लगडलेले हे साधेसुधे आंबे नाहीत...त्यांच्या सुरक्षेसाठी मालकानं अशी जय्यत तयारी केली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या आंब्यांची कुणी चोरी करू नये म्हणून 3 सुरक्षारक्षक आणि 9 कुत्रे इथं तैनात करण्यात आलेत. जबलपूरच्या वातावरणात तयार झालेला हा आंबा हजारोत नाही तर लाखो रुपयांत विकला जातो. म्हणून या आंब्याच्या सुरक्षेसाठी मोठी सिक्युरिटी बसवण्यात आलीय..आमराईचे मालक संकल्प सिंह परिहार यांनी ओसाड जमिनीवर ही आंब्याची बाग फुलवलीय. 


त्यांच्या बागेतील या जापानी आंब्याचं नाव टाइयो नो टमेंगो असं आहे. या आंब्याला सुर्याचं अंड म्हणून ओळखलं जातं. हा आंबा पूर्ण पिकल्यावर लाल आणि पिवळ्या रंगाचा होता. याचं वजन जवळपास 900 ग्रॅम असून तो खायला खूप गोड असतो. 2017 मध्ये जपानमध्ये जवळपास 3600 डॉलरमध्ये या आंब्याची बोली लावण्यात आली. 


भारतात या आंब्याची किंमत एका किलोसाठी अडीच लाख रूपये इतकी आहे. आपल्या खास वैशिष्ट्यामुळे आणि खास किंमतीमुळेच संकल्प परिहार यांनी बागेला कडक सुरक्षा दिलीय. 


संकल्प परिहार यांची बाग सध्या मध्य प्रदेशात चर्चेचा विषय बनलीय. अतिशय मेहनतीनं त्यांनी ही आमराई फुलवलीय. शेतक-यांनी पारंपरिक शेतीत अडकून राहण्यापेक्षा असे प्रयोग केले तर फळंही सोन्यासारखं उगवतं हेच परिहार यांनी दाखवू दिलंय.