राजस्थानमध्ये भूकंपाचे धक्के
पाकिस्तानातील सीबीपासून ४६ किलोमीटर लांब भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे.
जयपूर : रविवारी सकाळी राजस्थानमधील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. पाकिस्तानातील सीबीपासून ४६ किलोमीटर लांब या भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजस्थानमधील सिकरी, अलवर, दौसा, भरतपूरसह इतरही राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. राजस्थानमधील या भूकंपाने कोणत्याही प्रकारच्या मोठ्या नुकसानीची माहिती समोर आली नाही. परंतु अनेक घरांच्या भितींना तडे गेले आहेत. भूकंपाच्या हादऱ्यांनंतर अनेक घरांतील लोक घराबाहेर पडले. रविवारी सकाळी ५ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास ७ सेकंदांपर्यंत सतत भूकंपाचे हादरे बसले. रविवारी राजस्थानमध्ये आलेल्या या भूकंपाचा परिणाम पाकिस्तान, ईराण, अफगानिस्तानमध्येही झाला असल्याची माहिती मिळत आहे.
शनिवारी रात्री निकोबार महाद्वीपमध्येही भूकंपाचे हादरे बसले. निकोबार महाद्वीपमध्ये ४.७ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. या भूकंपाने कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती मिळत आहे.