अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याचे संकेत मिळू लागलेत- शक्तिकांता दास
`लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेले विविध निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यवहार वाढू लागले आहेत.`
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी, भारतीय अर्थव्यवस्था सामान्य स्थितीत परत येण्याचे संकेत दिसू लागले असल्याचं शनिवारी सांगितलं. लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेले विविध निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यवहार वाढू लागले आहेत. परंतु, पुरवठा साखळी पूर्णपणे कधी सुरु होईल हे अद्याप निश्चित नाही. मागणीची परिस्थिती सामान्य होण्यास किती काळ लागेल हे पाहावे लागणार आहे. तसंच कोरोना व्हायरस आपल्या संभाव्य वृद्धीवर किती काळ प्रभाव पाडतो हे पाहाणंदेखील महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी, एसबीआय बँकिंग आणि इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हला संबोधित करताना, रिझर्व्ह बँकेसाठी विकास प्रथम प्राधान्य आहे. परंतु त्याच वेळी आर्थिक स्थैर्यदेखील तितकंच महत्वाचं असल्याचं, त्यांनी सांगितलं.
नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सामान्य स्थितीत येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. सरकारने विशिष्ट लक्ष्य ठेऊन संबंधित सर्व उपाय आणि व्यापक स्तरावरील सुधारणांची घोषणा आधीच केली आहे. यामुळे देशाच्या संभाव्य वाढीस मदत होईल, असंही ते म्हणाले.
नोटबंदी झाल्याच्या चार वर्षांनंतर जुन्या नोटा घेऊन बँकेत गेले; आणि...
आर्थिक, नियामक आणि संरचनात्मक सुधारणांच्या क्षेत्रात ज्या काही उपाययोजना केल्या गेल्या आहेत, त्यामुळे नजीकच्या काळात कमीतकमी व्यत्ययात अर्थव्यवस्थेच्या वेगवान प्रगतीसाठी आवश्यक परिस्थिती निर्माण होण्यास मदत होईल, असं दास यांनी सांगितलं.