काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांना `ईडी`कडून अटक
डी.के. शिवकुमार यांची अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नवी दिल्ली: कर्नाटकमधील काँग्रेस पक्षाचे संकटमोचक अशी ओळख असणारे डी.के. शिवकुमार यांना मंगळवारी संध्याकळी दिल्लीत सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) ताब्यात घेण्यात आले.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती. गेल्या आठवड्यात डी.के. शिवकुमार यांची ईडीच्या चौकशीला हजर न राहण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. यानंतर ते दिल्लीत चौकशीसाठी दाखल झाले होते. तेव्हापासून चारवेळा ईडीने त्यांची चौकशी केली आहे. आयकर विभागाने डी.के. शिवकुमार यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केल्याचे समजते.
यापूर्वी डी.के. शिवकुमार यांनी आपण चौकशीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. मी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. भाजपच्या नेत्यांनी मला त्रास देणार असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. यामध्ये त्यांना आनंद मिळत असेल तर तो त्यांना मिळू दे. मात्र, मी चौकशीला सामोरे जाऊन पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
२०१७ मध्ये ईडीने डी.के.शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर छापे टाकले होते. या छाप्यात ८ कोटी ५९ लाखांची बेनामी रोकड आढळून आली होती. या प्रकरणात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ईडीने शिवकुमार यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे न्यायालयाकडे तक्रार केली होती.
डी.के. शिवकुमार यांची अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. सध्या ते सीबीआयच्या कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यानंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता 'ईडी'च्या फेऱ्यात सापडल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.