मुंबई : ईडीने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका दिला आहे. या दोघांचे १,३५० कोटी रुपयांचे हिरे आणि मोती यांच्यासारखं किंमती सामान भारतात आणण्यात ईडीला यश आलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी हे सामान दुबईमध्ये ठेवलं होतं. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीच्या चौकशीदरम्यान या दोघांनी काही सामान दुबईवरून हाँगकाँगला पाठवलं होतं. तर दुबईतलं काही सामान ईडीने आधीच भारतात परत आणलं होतं, पण १,३५० कोटी रुपयांचे हिरे आणि मोती हाँगकाँगला पोहोचले होते. 


नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचं हे सामान हाँगकाँगला पोहोचल्याचं ईडीला जुलै २०१८ साली समजलं होतं. तेव्हापासून ईडी हाँगकाँग सरकार आणि तिथल्या यंत्रणांसोबत या गोष्टी भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत होती, ज्याला आत्ता यश मिळालं. हाँगकाँगवरून १,३५० कोटी रुपयांचं २,३४० किलो वजनाचं सामान मुंबईमध्ये पोहोचलं आहे. 


भारतात परत आलेल्या १३२ कन्साईनमेंटपैकी ३२ नीरव मोदीच्या तर ७६ मेहुल चोक्सीच्या आहेत. याआधी ईडीने हाँगकाँगवरून मेहुल चोक्सीच्या ३३ कन्साईनमेंट जप्त करून भारतात परत आणल्या होत्या, याची किंमत १३७ कोटी रुपये होती. 


नीरव मोदी सध्या लंडनच्या जेलमध्ये आहे, तर मेहुल चोक्सीने एन्टिग्वाचं नागरिकत्व घेतलं आहे. दोन दिवसांपूर्वीच ८ जूनला मुंबईच्या स्पेशल पीएमएलए कोर्टाने नीरव मोदीची १,४०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.