नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आजदेखील ईडीसमोर चौकशी होणार आहे. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे वकील ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल झालेत. लंडनमध्ये कथित रुपात अवैध संपत्ती ठेवल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगशी निगडीत एका प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मेव्हण्याची आज पुन्हा एकदा चौकशी सुरु केलीय. याच प्रकरणात काल (बुधवारी) रॉबर्ट वाड्रा यांची जवळपास साडे पाच तास चौकशी करण्यात आली होती. दुसरीकडे कार्ती चिदंबरम यांचीदेखील ईडीसमोर चौकशी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी थोड्याच वेळात सुरू होईल. आर्थिक अफरातफर आणि परदेशात बेनामी मालमत्ता प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयामार्फत त्यांची चौकशी सुरू आहे. संरक्षण सामुग्री खरेदी गैरव्यवहारात मिळालेल्या दलालीतून लंडनमध्ये घर खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीतल्या न्यायालयानं वाड्रा यांनी चौकशीला सामोरं जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाले. साडे पाच तासांच्या चौकशीत वाड्रा यांनी अत्यंत छोटी उत्तरं दिली असून अंमलबजावणी संचालनालय आज पुन्हा एकदा रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करत आहे.


आपली लंडनमध्ये मालमत्ता नसल्याचा दावा वाड्रा यांनी ईडीसमोर केल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं लेखी देण्यास सांगितलं तसंच कोणतीही विधानं केली तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


वाड्रा खोटं बोलत आहे... ते चौकशीत सहकार्य करत नसतील तर त्यांना अटक व्हायलाच हवी, असं भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय.