काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स
75 वर्षीय सोनिया गांधी 8 जून रोजी ईडीसमोर हजर होणार होत्या. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
ED Summons: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने हा समन्स बजावला आहे. सोनिया गांधी यांना 21 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. यापूर्वी 75 वर्षीय सोनिया गांधी 8 जून रोजी ईडीसमोर हजर होणार होत्या. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तसेच डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. यासाठी सोनिया गांधी यांनी ईडीकडे काही दिवसांचा अवधी मागितला होता. त्यामुळे त्या काही आठवडे ईडीसमोर हजर राहू शकणार नसल्याचं सांगितलं होतं. ईडीनेही त्यांची विनंती मान्य केली होती. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना जुलैच्या अखेरीस हजर राहून मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले होते.
या प्रकरणी राहुल गांधी यांची पाच दिवसांत सुमारे 50 तास चौकशी करण्यात आली आहे. यादरम्यान त्यांचे जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नोंदवण्यात आले आहेत. ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केंद्रावर आरोप करत म्हटले की, ते सरकारी संस्थांचा दुरुपयोग करत आहेत.
2012 मध्ये नॅशनल हेराल्डचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की, काही काँग्रेस नेत्यांनी यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे अधिग्रहण केले होते.