सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या किंमतीत घट; केंद्र सरकारचा दावा
केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम दिसून येत आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील इंपोर्ट ड्युटी कमी केल्याचा परिणाम दिसून येत आहे. यामुळे देशातील बाजारात मोहरी व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत.
मागील महिन्यात आयात शुल्कात कपात
सरकारने म्हटले आहे की, मागील महिन्यात 11 सप्टेंबरला पाम तेल, सोया तेल आणि सुर्यफुल तेलावरील सिमा शुल्क कमी केले आहे. पाम तेलावरील आयात शुल्क 10 टक्क्यांनी कमी करून 2.5 टक्के करण्यात आले आहे. कच्चे सोया आणि कच्च्या सुर्यफुल तेलावरील आयात कर देखील 7.5 टक्क्यांनी कपात करून 2.5 टक्के करण्यात आले आहे.
खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये कपात
सरकारने आयात शुल्कात केलेल्या कपातीमुळे बाजारावर परिणाम होत असून महागाई कमी होण्यास मदत होणार आहे. खाद्य तेलांच्या किंमतींमध्ये थेट 2 टक्क्यांनी कपात झाली आहे. असा केंद्र सरकारचा दावा आहे.
सरकारने म्हटले की, मोहरीचे तेल वगळता इतर तेल बाहेरून आयात केले जाते. यासाठी आयात शुल्क कमी करून तेलाच्या किंमतींमध्ये घट होत आहे. आता देशात उत्पादित होणाऱ्या खाद्य तेलाच्या किंमती वेगवेगळ्या उपाय योजनांनी कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
साठेबाजी थांबवण्यासाठी प्रयत्न
सरकारकडून खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींमध्ये घट आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. होलसेल विक्रेते, मिल मालक आणि रिफायनरींना आपल्या साठ्याविषयीचे विवरण एका वेब पोर्टलवर रोज उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.