Shivsena शिंदेंचीच हा निकाल निवडणूक आयोगाने कशाचा आधारावर दिला? ही पाहा आकडेवारी
Eknath Shinde Faction Gets Shiv Sena Number Considered While Giving Verdict: या आकडेवारीचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलताना केला.
Eknath Shinde Faction Gets Shiv Sena: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. असं असतानाच निवडणूक आयोगाने कशाचा आधारे निकाल दिला यासंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकामध्ये दिली आहे.
काय आहे निवडणूक आयोगाच्या पत्रकात?
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निकालाच्या पत्रामध्ये अर्जदार म्हणून शिंदे गटाचा उल्लेख करण्यात आला आहे. तर प्रतिवादी म्हणून ठाकरे गटाचा उल्लेख करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचे आमदार आणि खासदार किती आहेत याची संख्या असलेलं एक टेबलच या पत्रात देण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिंदे गटाचे 55 पैकी 40 आमदार आहेत. तर ठाकरे गटाचे 55 पैकी 15 आमदार आहेत असा उल्लेख या निकालामध्ये आहे. तर विधान परिषदेमध्ये सर्वच्या सर्व 12 आमदार हे ठाकरे गटाचे असल्याचा उल्लेख या पत्रात आहे.
लोकसभेमधील आकडेवारीचाही उल्लेख निवडणूक आयोगाच्या निकालपत्रामध्ये आहे. शिवसेनेच्या एकूण 19 खासदारांपैकी 13 खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. तर ठाकरे गटाच्या बाजूने 4 खासदार आहेत असा उल्लेख असतानाच दावा मात्र 6 खासदारांबद्दल करण्यात आला आहे. राज्यसभेमधील तिन्ही खासदार हे ठाकरे गटाचे आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा निकालवर प्रतिक्रिया देताना आमदार, खासदारांची संख्या गृहित धरण्यात आल्याचं म्हटलं. "आमदार, खासदारांची संख्या लक्षात घेऊन निर्णय झालेले आहे. याचं कारण एखाद्या पक्षाची मान्यता त्या पक्षाला मिळालेल्या मतांच्या आधारे असते. ती मतसंख्या किंवा मतांची टक्केवारी आमदार, खासादारांच्या माध्यमातून ठरते. मी पूर्ण निकाल वाचला नाही. मी पूर्ण विश्लेषण करणार नाही. मी शिंदेजींचं आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं अभिनंदन करतो," असं फडणवीस यांनी सांगितलं.