श्रीगंगानगर : आतापर्यंत आपण मुलाने किंवा मुलीने मालमत्तेच्या मालकी हक्काचा दावा करताना पाहिले आहे. मात्र, या घटनेत वेगळंच काही बघायला मिळाले आहे. श्रीगंगानगरच्या रामसिंहपुरमध्ये एक आश्चर्यचकीत करणारी घटना घडली. इथे एका वृद्धाचा कँन्सरमुळे मृत्यू झाला आहे. अत्यंसंस्काराच्यावेळी वृद्धाच्या शवावर दोन महिला दावा करत असल्यामुळे एकच खळबळ उडाली. हे प्रकरण इतके वाढले की, अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. या सगळ्यामुळे अशी वेळ आली की, जोपर्यंत खरा वारसदार निश्चित होत नाही तोपर्यंत शवाला शवगृहातच ठेवण्यात आले. अखेर तीन तासानंतर त्या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीला मृतदेह सोपवण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीविजयनगर निवासी बृजलाल लावा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे, ते ग्राम पंचायतचे सचिव होते. मोहरादेवी यांच्याशी त्यांचे लग्न झाले. यातून त्यांना तीन मुले आहेत. काही कारणास्तव त्यांनी मोहरादेवींला सोडून दिले. त्यानंतर बृजलाल यांची 25 वर्षांनंतर अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या सर्वजीत कौर यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यानंतर दोघेही रामसिंहपूरमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यादरम्यान, बृजलाल यांचा कँन्सरमुळे मृत्यू झाला.


त्यानंतर सर्वजीतकौर यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. बाजारातून सर्व अंत्यविधीची सर्व सामग्री आणण्यात आली. त्याचवेळी मोहरादेवी आपल्या मुलांसोबत त्याठिकाणी पोहोचल्या आणि बृजलाल यांच्या मृतदेहावर आपला दावा असल्याचा सांगू लागल्या. मात्र, सर्वजीतकौरने तो मृतदेह देण्यास नकार दिला.


या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी पालिकेचे माजी अध्यक्ष सुशील मिड्डा उपस्थित होते. त्यांनी दोन्ही महिलांची बाजू ऐकून घेतली. मात्र, काही लोकांचे म्हणणे होते की, सर्वजीतकौर यांनी बृजलाल यांची अखेरपर्यंत सेवा केली. त्यामुळे मृतदेहावर त्यांच्या अधिकार आहे. मात्र, काहींनी मोहरादेवी ह्या कायदेशीररीत्या त्यांच्या पत्नी असल्याचे सांगितले.


अखेर मोहरादेवी यांना मृतदेह सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर अंत्यविधी त्यांचा मुलगा करेल आणि अंत्यविधी सामग्री सर्वजीतकौर देईल असा निर्णय घेण्यात आला आणि हे प्रकरण अखेर सुटले.