अरेरे! पेन्शनच्या पैशांसाठी १०० वर्षांच्या आजींना खाटेवरुन खेचत बँकेत नेण्याची वेळ
या प्रकरणी बँक मॅनेजरला निलंबित करण्यात आलं आहे.
भुवनेश्वर : ओडिशामध्ये सोमवारी सर्वांनाच हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. 70 वर्षांपर्यंत वय असलेल्या एका महिलेला, आपल्या 100 वर्षीय आईला खाटेवरुन, खाट खेचत बँकेत घेऊन जावं लागल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेतून पेन्शनची रक्कम काढण्यासाठी, खातेधारकाला समोर आणण्याचं बँकेकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे महिलेकडे कोणताही पर्याय नसल्याने तिने वृद्ध महिलेला खाटेवरुन खेचत बँकेत आणलं. आपल्या आईला खाटेवरुन बँकेत आणणारी महिलाही ज्येष्ठ नागरिक आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील 70 वर्षीय पुंजिमती देई या एक खाट खेचत नेत असल्याचं दिसतंय. या खाटेवर वृद्ध महिला झोपलेली दिसत आहे. वृद्ध महिलेचं वय 100 वर्षांपर्यंत असल्याची माहिती मिळत आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय पुंजिमती आपल्या 100 वर्षीय आईच्या जनधन खात्यातून 1500 रुपये काढण्यासाठी गेल्या होत्या.
बँकेत गेल्यानंतर, खात्यातून पैसे काढण्यासाठी खातेधारकाला म्हणजेच वृद्ध आईला बँकेत प्रत्यक्ष येण्याबाबत, बँकेकडून सांगण्यात आलं. त्यानंतर वृद्ध आईला बँकेत आणण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय नसल्याचा दावा 70 वर्षीय पुंजिमती देई यांनी केला आहे. या घटनेनंतर बँक मॅनेजरवर कारवाई करण्यात आली असून त्याचं निलंबन करण्यात आलं आहे.