नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना ७२ तास आणि मायावतींना पुढील ४८ तास प्रचारात सामील होता येणार नाही. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून ही बंदी लागू होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी गाझियाबाद येथील प्रचारसभेत भारतीय लष्कराचा उल्लेख मोदी सेना असा केला होता. त्यावरूनही मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र, त्यावेळी निवडणूक आयोगाने योगींना केवळ समज दिली होती. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये मेरठ येथील सभेत वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले होते. निवडणुकीत बजरंग बलीचे समर्थक आपल्याला सोडणार नाहीत, हे त्यांना माहिती असल्याने काँग्रेस, सपा आणि बसपा अल्पसंख्यांकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस, सपा, बसपाचा अलीवर विश्वास असेल तर आमचा बजरंग बलीवर विश्वास आहे. बजरंग बलीचे समर्थक आपल्याला सोडणार नाहीत हे सपा, बसप आणि काँग्रेसला ठाऊक आहे म्हणून ते ‘अली, अली’ ओरडत आहेत असे योगींनी म्हटले होते. 



तर मायावती यांनीही देवबंद येथील सभेत मुस्लीम समाजाला उद्देशून आक्षेपार्ह विधान केले होते. काँग्रेस भाजपाचा सामना करण्यासाठी सक्षम नाही. मला तुम्हा सर्वांना खासकरुन मुस्लिमांना सांगायचे आहे की, इथे तुम्ही काँग्रेसला मतदान केले तर त्याचा फायदा भाजपाला होईल, असे मायावतींनी म्हटले होते. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत स्थानिक प्रशासनाकडून याचा अहवालही मागवला होता.