भाजप उमेदवार गौतम गंभीर अडचणीत
भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नवी दिल्ली : क्रिकेटचे मैदान गाजविणारा गौतम गंभीर निवडणुकीच्या मैदानावर अडचणीत सापडला आहे. भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गौतम गंभीर यांच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या मुद्द्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता त्यांनतर त्यांच्यावर परवानगी न घेता प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.
पूर्व दिल्लीमधून गौतम गंभीर याने शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता निवडणूक प्रचारसभा घेतली. या विरोधात निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांकडून तक्रार केली होती. त्यामुळे आयोगाने याबाबत तात्काळ दखल घेत दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गौतम गंभीरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
याआधी गौतम गंभीर यांचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याच्या आरोप करत त्यांच्याविरोधात ‘आप’ने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर १ मे रोजी सुनावणी होणार आहे. ‘आप’च्या उमेदवार आतिशी यांनी तक्रार केली आहे.