कोलकाता : प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं. या प्रतिक्रियांमध्येच आता बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. मतदार हा नेत्यांचं काम पाहून त्यांना मत देतो, असं म्हणत निवडणूक ही सौदर्यस्पर्धा नसल्याचं विधान त्यांनी केलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'निवडणूक हा काही कुस्तीचा सामना नाही किंवा सौंदर्यस्पर्धाही नाही. किंबहुना ही कोणत्याच प्रकराची स्पर्धा नाही', असं मोदी म्हणाले. हावडा येथे पक्षाच्या एका रॅलीत सहभागी होण्यासाठी आलं असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 


निवडणूका म्हणजे राजकीय स्पर्धा असून, इथे जनता नेतेमंडळींनी केलेली कामं पाहूनच त्यांना मत देते ही बाबही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील नव्या कारकिर्दीविषयी टीका करणारं वक्तव्य करत सुशील कुमार मोदी यांनी गांधी कुटुंबावर आरोपही केले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांनी (गांधी कुटुंबाने) कशा प्रकारे देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ दिलं नाही याकडेही मोदी यांनी लक्ष वेधलं. 



भाजपा नेतेमंडळींकडून गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका गांधी, गांधी कुटुंब आणि काँग्रेसवर केल्या जाणाऱ्या टीका पाहता राजकीय वातावरण चांगलच रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचविषयी प्रतिक्रिया देत राज्यसभा सदस्य आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदीप भट्टाचार्य यांनी भाजपावर दडपण आल्याचं वक्तव्य केलं. 


'गांधी कुटुंबावर करण्यात येणारे आरोप पाहता ही बाब लक्षात येत आहे की भाजपावर दडपण आलं आहे. भारतीय राजकारणाला हे कुटुंब कलाटणी देऊ शकतं ही बाब ते (भाजपा) जाणतात. त्यामुळे गोंधळात टाकणारी वक्तव्यं ते करत आहेत', असं भट्टाचार्य म्हणाले. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी उत्तर प्रजेशच्या पूर्व भागातील राजकीय सूत्रांसाठी प्रियांका गांधी यांच्याकडे महासचिव पदाची धुरा सोपवली. तेव्हापासूनन राजकीय वर्तुळातून बऱ्याच चर्चांनी डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं.