Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणावरुन देशातील राजकारण तापलेलं असतानाच या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. मात्र या प्रकरणार आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया नोंदवत पक्षाची बाजू मांडली आहे. काळा पैसा नष्ट करण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची योजना अमलात आणली होती. मात्र ही योजनाच रद्द झाल्याने काळ्या पैशाचा पुन्हा वापर केला जाईल, अशी भीती अमित शाहांनी व्यक्त केली आहे.


अमित शाहांना नेमका काय प्रश्न विचारला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाबद्दल मी काहीही मत व्यक्त करणार नाही,' असं अमित शाहांनी 'इंडिया टु डे कॉनक्लेव्ह'च्या कार्यक्रमामध्ये म्हटलं. राहुल कनवाल यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाहांना इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. 'इलेक्टोरल बॉण्ड देणाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेकजण आपआपली गणितं मांडत आहेत. 2-3 गोष्टी विचारल्या जात आहेत. देणगी देणाऱ्या ज्या टॉप 30 कंपन्या आहेत. त्यापैकी 50 टक्के कंपन्यांवर सीबीआय, ईडीचे खटले सुरु आहेत. राहुल गांधी आणि विरोधक पत्रकार परिषद घेऊन सांगत आहेत हा वसुलीचा प्रकार आहे. एकीकडे एजन्सी पाठवा आणि दुसरीकडे इलेक्टोरल बॉण्ड घ्यायला सांगा, असा आरोप होत आहे. या सर्व राजकारणावर केंद्रीय गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला.


शाह म्हणाले, मला कोणी सांगू शकेल का?


"इलेक्टोरल बॉण्ड योजना काळा पैसा नष्ट करण्यासाठी आणली गेली. मी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वांना मानावा लागतो. सोमवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. मात्र मी कोणत्याही मंचावर कोणत्याही व्यक्तीशी चर्चा करायला तयार आहे की काळा पैसा नष्ट करण्यासाठी ही कशी अमलात आणली गेली," असं अमित शाहांनी म्हटलं. "इलेक्टोरल बॉण्ड येण्याआधी पक्षांना देणगी देण्याची पद्धत कशी होती हे मला कोणी सांगू शकेल का? बॉण्डमध्ये कशाप्रकारे पैसे येतात. कंपन्या धनादेश आरबीआयला देऊन बॉण्ड खरेदी करता आणि देतात. यामध्ये गोपनीयतेचा प्रश्न आला. रोख देणगी देणाऱ्या कोणाची नावं आतापर्यंत जारी केली का?" असं सवा अमित शाहांनी केला. 


नक्की वाचा >> 'दाऊदही अशाच खंडण्या घ्यायचा, मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांची फौजच उभी केली; ED भाजपावर कारवाई करणार का?'


14 हजार कोटींचे बॉण्ड गेले कुठे?


इलेक्टोरल बॉण्डमधून भाजपाला 6 हजार कोटी रुपये मिळाले. सर्व पक्षांना मिळालेल्या इलेक्टोरल बॉण्डची किंमत 20 हजार कोटी इतकी आहे. मग 14 हजार कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड कोणाला मिळाले हे ही तपासून पाहायला हवे, असंही अमित शाहांनी म्हटलं आहे. ""भाजपा सत्तेत असल्याने इलेक्टोरल बॉण्डचा सर्वाधिक फायदा झाला वगैरे असा एक दावा केला जात आहे. जगातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचं माध्यम इलेक्टोरल बॉण्ड असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. देशात आमचे 303 खासदार आहेत. आम्हाला 6 हजार कोटी रुपयांचे बॉण्ड मिळाले. विरोधकांचे 242 खासदार असलेल्या विरोधी पक्षांना 14 हजार कोटींचे बॉण्ड मिळाले आहेत. मग हा गोंधळ कशासाठी. मी दाव्याने सांगतो की जेव्हा हिशोब काढला जाईल तेव्हा ते लोक तुम्हाला चेहरा दाखवू शकणार नाहीत. त्यावेळेस तुम्ही अशा चर्चासत्राचं आयोजन करा मी सोडून कोणीच येणार नाही," असं अमित शाहा म्हणाले. 


नक्की वाचा >> 'इलेक्टोरल बॉन्ड' म्हणजे काय? BJP ला हजारो कोटी कसे मिळाले? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय?


12 लाख कोटींचे घोटाळे


अनेक मोठ्या उद्योजक घराण्यांची नावं देणगीदारांमध्ये नाही ज्यांच्या नावाने देशात राजकारण होतं. त्यांनी भाजपाला देणगी दिली नाही का? असा प्रश्न अमित शाहांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमित शाहांनी, "स्वातंत्र्यानंतर उद्योजकांनी राजकीय पक्षांना देणगी दिलीच नाही का? त्यांच्या नावांची तरी घोषणा झाली का कधी? आता बॉण्ड्समुळे नावं तरी समोर आली आहेत. हे लोक काय गोपनियतेबद्दल बोलता. कोट्यवधी रुपयांची रक्कम रोख देणगी म्हणून घेतली. 12 लाख कोटींचे घोटाळे, भ्रष्टाचार केले. तुरुंगात जात आहेत आणि आमच्याकडे हिशोब मागताय?" असं म्हणत अमित शाह संतापले. एका पक्षाला देणगी दिल्यानंतर दुसरा पक्ष त्रास देईल अशी भीती देणगीदारांना असल्याने त्यांची नावं गुप्त ठेवण्यात आल्याचा दावा अमित शाहांनी केला.