Pulwama Attack : इलेक्ट्रीशियनने घडवलेला पुलवामा हल्ला, सूत्रांची माहिती
तो `मोहम्मद भाई` या नावाने ओळखला जातो.
श्रीनगर : फेब्रुवारी महिन्यात जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्हयात झालेला हल्ल्यानंतर सर्वत्र वातावरण बदलून गेलं. सीआरपीएफचे जवान जात असणाऱ्या बसच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. अतिशय भीषण स्वरुपातील या हल्ल्याच्या सूत्रधाराचं नाव समोर आलं आहे. 'द टेलिग्राफ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्याचं नाव मुदस्सर अहमद खान असून तो 'मोहम्मद भाई' या नावाने ओळखला जातो. रविवारी तपास यंत्रणांकडून याविषयीची माहिती देण्यात आली.
हल्ल्याच्या तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ वर्षीय खान हा एक इलेक्ट्रीशियन असून, तो पदवीधारक आहे. त्यानेच पुलवामा हल्ल्यासाठी कार आणि स्फोटकं पुरवली होती. खान हा त्रालच्या मिर मोहल्ला येथील रहिवासी असून, तो २०१७ मध्ये जैशमध्ये सहभागी झाला होता. ज्यानंतर नूर मोहम्मद तांत्रे ऊर्फ ‘नूर त्राली’ याने त्याला जैशच्या मुख्य प्रकाशझोतात आणलं.
तांत्रे २०१७ मध्ये मारला गेला. ज्यानंतर खान १४ जानेवारी २०१८ मध्ये खानही त्याच्या घरातून बेपत्ता झाला. पुलवामा हल्ल्यादरम्यान कार चालवणारा फिदायीन आदिल अहमद दार हा खानच्या सतत संपर्कात होता अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर खानने एक वर्षाचा डिप्लोमा करत आयटीआय मधून इलेक्ट्रीशियनचं शिक्षण घेतलं होतं. त्याचे वडिल मजुर असून, मुदस्सर खान याचा फेब्रुवारी २०१८ मध्ये संजवान येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही सहभाग होता असं म्हटलं जातं. या हल्ल्यात ६ जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
पुलवामा हल्ल्याचा तापसा करण्यासाठी म्हणून एनआयएने खानच्या घरावर २७ फेब्रुवारीला छापा मारला होता. यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यात वापरली गेलेली एक मारुती इको मिनी व्हॅन जैशच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्यांने हल्ल्याच्या १० दिवसांपूर्वी खरेदी केली होती. सज्जाद भट नावाचा हा दहशतवादी तेव्हापासून फरार असून आता सक्रिय दहशतवादी झाला असल्याचे समजते.