कर्नाटकातील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस सतर्क, मध्य प्रदेशात तातडीची बैठक
काँग्रेस आधीच सतर्क. मध्य प्रदेशमध्ये तातडीची बैठक.
भोपाळ : कर्नाटकात राजकारण जोरात सुरू असताना मध्य प्रदेशात तशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी काँग्रेस आधीच सतर्क झालीय. मुख्यमंत्री निवासस्थानी आमदारांची बैठक घेण्यात आली. बैठकीला काँग्रेस महासचिव गुलाम नबी आझादही उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना एकजुटीने राहण्याचा सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. विरोधकांनी कुठल्याही प्रकारचा फायदा घेऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
दरम्यान, काँग्रेस पक्षनेत्या सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीत महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या नावावरही या बैठकी चर्चा होणार असल्याचे सांगितले जात होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवडीसाठी पक्षावर दबाब वाढत आहे. त्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे. तब्बल १४ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार या राजीनामासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, ज्या आमदारांनी प्रत्यक्ष भेटून राजीनामा द्यायचा असतो. मात्र, तसे काहीही झालेले नाही. तसेच कोणाच्या दबावाने राजीनामा दिलाय का, याची मी माहिती घेणार आहे. त्यानंतर राजीनाम्याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांचे राजीनामे स्विकारणार का की नाही, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.