आज भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सकाळी लाल किल्ल्यावरुन (Red Fort) देशवासियांना संबोधित केलं. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी एक खूर्ची रिकामी होती. ही खूर्ची काँग्रसेचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासाठी राखीव होती. मल्लिकार्जून खरगे या कार्यक्रमाला आलेच नाही. दरम्यान, काँग्रेस पक्षाने यावर स्पष्टीकरण दिलं असून सुरक्षेच्या कारणास्तव पक्षाचे अध्यक्ष खरगे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले असं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्लिकार्जून खरगे यांनी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावल्याने सध्या चर्चा रंगली आहे. यादरम्यान, मल्लिकार्जून खरगे यांचं नाव लिहिलेल्या लाल रंगाच्या खुर्चीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरगे यांनी कार्यक्रमाला हजेरी न लावल्याने त्यांच्यावर भाजपाकडून टीका होत आहे. पण काँग्रेसने सुरक्षेच्या कारणास्तव खरगे गैरहजर होते असा दावा केला आहे. 


"जर त्यांनी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला हजेरी लावली असती तर त्यांच्या घऱी आणि पक्ष कार्यालयात झालेल्या ध्वजारोहणाला ते उपस्थित राहू शकले नसते. सुरक्षेच्या कारणांमुळे ते लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला हजर नव्हते. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी दोन तास लागतात आणि ते लवकर निघू शकत नव्हते," असं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलं आहे.


यानंतर आपल्या अनुपस्थितीसंबंधी बोलताना मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितलं की, डोळ्यांशी संबंधित समस्या असल्याने मी कार्यक्रमाला हजर राहू शकलो नाही. तसंच प्रोटोकॉलप्रमाणे मला घरातील आणि पक्ष कार्यालयातील ध्वजारोहणाला हजर राहणं गरजेचं होतं. 


पुढे ते म्हणाले की, सुरक्षा इतकी कडक होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत जात नाहीत तोवर ते कोणालाही जाऊ शकत नव्हते. वेळेची कमतरता असल्याने आपण लाल किल्ल्यावर जाऊ शकलो नाही. "प्रथम म्हणजे मला डोळ्यांसंबधी समस्या आहे आणि दुसरं म्हणजे मला प्रोटोकॉलप्रमाणे माझ्या घरी सकाळी 9.20 ला ध्वजारोहण करायचं होतं. यानंतर मला पक्ष कार्यालयात जायचं होतं. त्यामुळे मी पक्ष कार्यालयात गेले होतो," असं मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितलं.


"सुरक्षा इतकी कडेकोट आहे की पंतप्रधान निघण्यापूर्वी ते इतर कोणालाही जाऊ देत नाहीत. मला वाटले की मी येथे वेळेवर पोहोचू शकणार नाही. वेळेचा अभाव आणि सुरक्षेची स्थिती यामुळे मला तिकडे (लाल किल्ल्यावर) न जाणं योग्य वाटलं,” असं ते म्हणाले. 


पक्षाचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी मल्लिकार्जून खरगे अनुपस्थित राहिल्याने भाजपा नाराज असल्याचं म्हटलं आहे. "पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाला खरगे उपस्थित नव्हते यामुळे भाजपा नाराज आहे. त्यांच्या मार्गाच्या व्यवस्थेमुळे खरगेंना ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पक्ष मुख्यालयात वेळेवर पोहोचणे अशक्य झाले असते याची पंतप्रधानांना जाणीव आहे का? स्वातंत्र्यदिनी आपल्या मुख्यालयात ध्वज फडकवण्याचे स्वातंत्र्य नाही का?," अशी विचारणा पवन खेरा यांनी केली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून संबोधित केले. मध्यमवर्गाचा उदय, महिला-केंद्रित विकास, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणासह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं. नरेंद्र मोदींनी तब्बल 90 मिनिटं भाषण केलं.